गोदावरी काठावरच्या संधीकाळाला ईश्वर घोरपडे यांच्या राग भटियारने उजाळा

  • नांदेडकरांनी अनुभवले भटियार रागातील सूरमयी उमलणे
  • दिवाळी पहाटच्या दुसऱ्या दिवशीही नांदेडकरांची भरभरून दाद

नांदेड, (जिमाका) :- गोदावरीचा काठ सकाळच्या किरणांच्या प्रकाशात असतांना याला साक्षीदार होणे हीच मुळात मोठी पर्वणी कोणासाठीही ठरू शकते. अशावेळी सुर्यांची किरणे काठाला स्पर्श करणाऱ्या काळात राग भटियारचे सूर रसिकांना ऐकण्याची संधी मिळणे म्हणजे तो संधीकाळ किती लाखमोलाचा असू शकेल याची अनुमती आज नांदेडच्या रसिकांनी अनुभवली. निमित्त होते “दिवाळी पहाट-23” आणि सकाळच्या या कोमल रागाला तेवढ्याच कोमलतेने उमलणारे गायक होते पुणे येथील ईश्वर घोरपडे.

संधीकाळाला प्रकाशाच्या मध्यम लयीने जसा उजाळा मिळावा तसा उजाळा ईश्वर घोरपडे यांनी “करम करो करतार…” या मध्यलय रूपक तालातील बंदिशीने गोदावरी काठावरील दिवाळी पहाटच्या मैफलीला दिला. यानंतर धृत एकतालातील “उल्लंघ्य सिंधो” हा श्लोक अलगत सादर केला. निवृत्ती महाराजांचा “जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार”, संत तुकारामांचा “अमृताची फळे अमृताची वेली” हे अभंग त्यांनी सादर केले. या अभंगाच्या भावार्थात एक एक पदर जसा उलगडून दाखवावा तशी अनुभूती रसिकांना देत दिवाळी पहाटची ही मैफल त्यांनी नाट्य गिताकडे नेली. “सुरत पिया की”, छेडियल्या तारा हे नाट्य गीत सादर करून “ऐकुन वेणुचा नाद” ही गवळन सादर करून त्यांनी “सावळे परब्रम्ह” या भैरवीच्या तालात सर्व रसिकांना तल्लीन करून ही मैफल अधिक उजळून टाकली.

ईश्वर घोरपडे यांना प्रशांत गाजरे यांनी तबल्यावर, नचिकेत हरिदास यांनी संवादिनीवर, विश्वेश्वर कोलंबीकर यांनी पखावजवर एकात्म साथ दिली. मंजिरीवर सचिन शेटे यांनी साथ दिली. जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरूद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेडच्यावतीने आयोजित दिवाळी पहाट 2023 कार्यक्रमातील आजच्या घोरपडे यांच्या कार्यक्रमाचे निवेदन स्वयंवर प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. सुनिल नेरलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *