नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे स्थानकाच्या कंपाउंडवॉलच्या आतील भागात 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास एका 65 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या संदर्भाने वजिराबादचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक डी.एस.केंद्रे यांनी शोध पत्रिका जारी करून जनतेला आवाहन केले आहे की, कोणी या अनोळखी मयत व्यक्तीचा ओळखत असेल तर त्या संबंधीची माहिती वजिराबाद पोलीस ठाण्यात द्यावी.
राजू अर्जुन वने हे नेहमी प्रमाणे 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता रेल्वे स्थानकाच्या आतील कंपाऊंडमध्ये असलेल्या वाहनतळावर आपल्या नोकरीसाठी गेले असतांना गेट क्रमांक 1 च्या बाजूला एक अनोळखी 65 वर्षीय व्यक्ती मृतअवस्थेत पाहिला.याबाबत त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार वजिराबाद पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 प्रमाणे आकस्मात मृत्यू क्रमांक 87/2023 दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक डी.एस.केंद्रे यांच्याकडे देण्यात आला.
डी.एस.केंद्रे यांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार मरण पावलेल्या अनोळखी व्यक्तीचे वय 65 वर्ष आहे. रंग सावळा आहे. डोक्याचे केस पांढरे विरळ टक्कल पडलेले आहे. दाढी-मिशी बारीक आहे. उंची 5 फुट 4 इंच आहे. त्यांच्या अंगात पोशाख राखाडी रंगाचा मळकट पॅन्ट, निळ्या रंगाचे मळकट शर्ट, निळसर रंगाची बनियन आणि चौकडा असलेली लुंगी परिधान केलेली आहे. मयत अनोळखी व्यक्ती हा मुस्लिम समाजाचा असावा असे शोध पत्रिकेत लिहिलेले आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक डी.एस.केंद्रे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणी या अनोळखी मयत व्यक्तीचा ओळखत असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात या संदर्भाची माहिती द्यावी. तसेच वजिराबादचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500 आणि डी.एस.केंद्रे यांचा मोबाईल क्रमांक 9970381047 यावर सुध्दा अनोळखी मयत माणसाबद्दल माहिती देता येईल.
65 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला; सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक डी.एस.केंद्रे यांचे ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन