नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईच्या रागावण्याने घरातून निघून गेलेल्या 15 वर्षीय बालिकेला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नांदेडने दीड महिन्यानंतर शोधून त्या बालिकेच्या मर्जीप्रमाणे तिला सुधारगृहात ठेवले आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक 15 वर्षीय बालिका आईसोबत वाद झाल्यामुळे घरातून निघून गेली होती. त्याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 676/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जामोदकर यांच्याकडे होता. दिवाळीचा सण सुरू असतांना सुध्दा पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने सतत 15 दिवस या बालिकेचा शोध लावतांना बरीच मेहनत घेतली आणि ती बालिका विदर्भात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध पथकास विदर्भात पाठविण्यात आले आणि मुलीला आपल्या ताब्यात घेतले. मुलीने दिलेला जबाब आणि तिची इच्छा यानुसार तिला सध्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी या बालिकेला परत आणण्यासाठी मेहनत घेणारे पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, जामोदकर, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, किशन चिंतोरे, राजू सिटीकर, दिपक आढणे, गणेश जाधव, यशोदा केंद्रे आणि आठवले यांचे कौतुक केले आहे.