नांदेड(प्रतिनिधी)-मराठा समाज हा प्रस्तापित समाज आहे याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा केलेला आहे. म्हणून आता कुणबी या नावावर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर मराठा समाजाने डल्ला मारु नये असे प्रतिपादन ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केले.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश अण्णा शेंडगे बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. पावणे दोन कोटी नोंदी शोधल्यानंतर फक्त 11 हजार कुणबी नोंदी सापडल्या. त्यानंतर मागणी बदलण्यात आली आणि आम्हाला सरकट कुणबी जातीच्या प्रमाणपत्रांवर ओबीसी आरक्षण मिळावे असे बोलले जावू लागले. वेळोवेळी मागण्या बदलून आमचे सामाजिक मागसलेपण मराठा समाजाने सिध्द करण्याचा प्रयत्न केला. खरे तर मागसवर्गीयांनी भोगलेले भोग मराठा समाजाने आजपर्यंत भोगलेच नाहीत. म्हणून मनोज जरांगेंची मागणी संविधानाला धरुन नाही. गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतू 70 वर्षापासून राज्यकर्ता समाज असलेल्या मराठा समाजाचे खासदार, आमदार, मंत्री, अनेक कारखाने आहेत. त्यात 70 टक्के कारखान्यांचे मालक मराठा समाजाचे लोक आहेत.जास्तीत जास्त शिक्षण संस्था त्यांच्याच आहेत. नोकरीमध्ये सुध्दा मराठा समाजाची संख्या भरपूर आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे सामाजिक मागसलेपण नाकारले आहे.
गरीब मराठा समाजाच्या लोकांना ईओडब्ल्यूमध्ये 10 टक्के आरक्षण आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात त्यांचेच सरकार आहे. तेंव्हा मराठा समाजाने नवीन आरक्षण घेण्यास आमची काही एक हरकत नाही. परंतू गरीब ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारू नये. राज्यात 60 टक्के ओबीसी आहेत. मराठा समाजाची संख्या 32 टक्के आहे. मराठा आरक्षण मागणी सुरू झाल्यानंतर छगन भुजबळांबद्दल वाईट बोलले जात आहे. पण जर तुम्ही एक छगन भुजबळ पाडला तर आम्ही 160 पाडू असे प्रकाश अण्णा म्हणाले. 2024 च्या निवडणुकांमध्ये ओबीसी ताकत दाखवून देऊ आणि सरकार खाली खेचून आणू असे प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले.