
नांदेड(प्रतिनिधी)-कोणत्याही कुख्यात माणसाच्या नावाने कॉल आला आणि खंडणी मागण्यात आली तर पोलीसांशी संपर्क साधा. पोलीस त्या व्यक्तीला सुरक्षा देतील आणि त्याचे नाव गुप्त ठेवून खंडणी मागणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करेल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
या प्रसंगी पुढे बोलतांना एक व्यक्ती ब्युटी पार्लर व्यवसायीक आहे. तो कौठा भागात राहतो त्याला दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबर रोजी तीन वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल करून मी रिंदा बोलतोय आज रात्री 8 वाजेपर्यंत 5 लाख रुपये तयार ठेव, पोलीसात तक्रार करू नको नाही तर तुझी खैर नाही, तुझे आणि तुझ्या बालकांचे तुकडे करून टाकू असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 820/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 387, 34 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण यांच्याकडे देण्यात आला.
या प्रकरणात रिंदाचे नाव वापरले गेले होते तेंव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, उदय खंडेराय आदींनी या प्रकरणात बारकाईने लक्ष घातले.पोलीसांनी या प्रकरणी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच फोन क्रमांकांवरून लोकेशन प्राप्त केले. यानंतर पोलीसांनी अमित अनिल सावामचल (21) रा.वाल्मीकनगर नांदेड आणि जसप्रितसिंघ प्रतापसिंघ मठाळु (20) रा.गुरूद्वारा गेट नंबर 1 जवळ अशा दोघांना पकडले. पैशांच्या लोहा पायी आम्ही ही कृती केल्याचे या दोघांनी सांगितले आहे. यानंतर सुध्दा याबाबतचा सखोल तपास करण्यात येईल असे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.
कुख्यात व्यक्तींचे नाव घेऊन अशा प्रकारे खंडणी मागणीचा एक नवीन धंदा मागील वर्षभरात बऱ्याच वेळेस घडला आहे. ज्या व्यक्तीला अशी मागणी झाली असेल त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी. जेणे करून खोट्या नावाचा आधार घेवून खंडणी उकळणाऱ्या लोकांना ताब्यात घेता येईल आणि त्यांच्याविरुध्द कार्यवाही करता येईल. सोबतच कोणी व्यक्ती गुपचूप खंडणी देत असेल तर पुढे तो व्यक्ती सुध्दा गुन्हेगार होवू शकतो असे पोलीस अधिक्षक म्हणाले. तेंव्हा कोणतीही भिती न बाळगता झालेल्या घटनेसाठी पोलीसांना माहिती द्या जेणे करून गुन्हेगारांवर वचक राहिल.
ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार ज्ञानोबा कौठेकर, संतोष बेल्लूरोड, शेख सत्तार, अर्जुन मुंडे, शिवानंद कानगुले, सायबर विभागातील पोलीस उपनिरिक्षक दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे आणि सिमा पठाण यांनी केले.