चिमुकली पोरगी माझी, खुबीने आवरे सारे घराचे खांब झुकतांना

हास्य कवी संमेलनाने केली आनंदाची लय लूट 

नांदेड (जिमाका) – दिवाळी पहाट 2023 उपक्रमांतर्गत दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सांज दिवाळी हास्यफराळ या बंदाघाट येथे पार पडलेल्या हास्य फराळ कवी संमेलनाचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. हास्य हे जीवनाचे अविभाज्य अंग असले तरी हास्याला कुठेतरी कारुण्याची झालर असते याचा प्रत्यय या कवी संमेलनाने रसिकांना दिला.

 

कवी संमेलनाची सुरुवात शंकर राठोड यांच्या सखे तू लईच हुशार पण मला काहीच येईना तर अनिल दीक्षित यांच्या हो उरात होतय धडधड या कवितेने मजा आणली. कवी अरुण पवार यांच्या “भेगाळलेली भुई आणि झाली पानगळ! सोशिते रे साऱ्या यातनांची कळा!!, अशी काळोखाच्या राती माय चांदणं वेचिते, वायली राहिली मुलं दोघांची वाटणी! परसात बाप गोठ्याचा धनी!! या कवितेने रसिकांना सुन्न केले. कवी केशव खटिंग यांच्या, “मह्या बापाचं नावं काढायचं नाही’ असं असं लेक चवताळून म्हणू शकते, जलमाच्या सोबत्याला बी ही कविता सादर करून वास्तव मांडताना रसिकांना प्रखर सत्याची जाणीव करून दिली.

संतोष नारायणकर यांनी “जरा न राहो पेला रिकामा टाक भरुनी काठोकाठ! पेल्यामधून उसळो मदिरा जशी उसळते सागर लाट आणि मामाला माझ्या दोन होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी! मामा तर म्हणला कोणती बी कर… जमलंच तुला तर दोन्ही बी कर, म्हणताच प्रचंड हशा पिकला. गझलकार बापू दासरी यांनी अतिशय खुसखुशीत विनोदी किस्से सांगून बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन केले.

 

एकाच थेंबाने शहारले अंग कसा हा प्रसंग जीवघेणा या कवितेद्वारे मानवाचा जन्म थेंबातून होऊन थेंबातून कसा संपतो हे स्पष्ट करून त्यांनी कवी संमेलनाचा समारोप त्यांच्या, “अताशा भासते मोठी चिमुकली पोरगी माझी, खुबीने आवरे सारे घराचे खांब झुकतांना” या शेराने आजकाल कमावत्या मुली कसं घर सावरतात हे वास्तव मांडले. रसिक प्रेक्षकांचे डोळे या कवितेने पाणावले. खचाखच भरलेला बंदाघाट आणि प्रेक्षकांनी दिलेली मनमुक्त दाद हे या कवी संमेलनाचे वैशिष्ट्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *