नांदेड(प्रतिनिधी)-नवऱ्या दारु पिण्याच्या सवयीमुळे आपल्या पाच वर्षीय बालकाला सोबत घेवून 30 वर्षीय बालिका काळेश्र्वर मंदिराच्या पाठीमागे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतांना दामिनी पथकाने त्यांना ताब्यात घेवून, समुपदेशन करून सुखरुप त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.
काल दि.17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 6.30 या वेळेदरम्यान दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, महिला पोलीस अंमलदार नलगौंडे, घागरे आणि वाहन चालक गोरलावाड हे विष्णुपूरी येथील काळेश्र्वर मंदिराच्या आसपास गस्त करत असतांना काळेश्र्वर मंदिराच्या पाठीमागील पायऱ्यावर एका 5 वर्षीय बालकाला त्याची आइृ बळजबरीने नदीकडे ओढत होती. मुलगा जोरजोरात रडत होता तेंव्हा दामीनी पथकाने लगेच तिकडे धाव घेवून आई आणि पाच वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. माझा नवरा दारु आणि जुगाराच्या आहारी गेला असून मला दररोज दारु पिऊन मारहाण करतो. नवऱ्याच्या आणि सासरच्या इतर मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून नैराश्य भावना तयारी झाली आणि मी जिव देण्यासाठी आले होते असे त्या महिलेने सांगितले. त्यानंतर दामिनी पथकाने त्या महिलेच्या सासरच्या मंडळींना बोलावून आणि इतर नातेवाईकांना बोलावून तिची समजूत काढली आणि तिला समुपदेशन करून तिला सुखरुप नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. सोबतच या पुढे काही अडचण आली तर टोल फ्री क्रमांक 112 वर कॉल करण्यास तिला समजावले. काही कौटुंबिक वाद असल्यास भरोसासेल किंवा महिला सहाय्य कक्षाची मदत घेण्यास तिला सुचना करण्यात आल्या. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दामिनी पथकाचे या उत्कृष्ट कामासाठी कौतुक केले आहे.
काळेश्र्वर मंदिराच्या परिसरात आणि जिल्ह्यात नेहमी वावरणाऱ्या सुजान नागरीकांना पोलीस विभागाने आवाहन केले आहे की, जर कोणी महिला, पुरूष काळेश्र्वर मंदिराजवळ असलेल्या घाटावर संशयीत फिरत असेल तर, त्याच्याकडे पाहिल्यास तो दु:खा आहे अशी शंका येत असेल तर त्वरीत प्रभावाने संबंधीत पोलीस ठाणे, किंवा 112 या टोल फ्रि क्रमांकावर माहिती द्यावी जेणे करून अशा दुर्देवी घटनांना रोखता येईल.
दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षीय बालकासह जिव देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या 30 वर्षीय महिलेला दामिनी पथकाने वाचवले