नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे इतवाराच्या हद्दीत ममतानगर मध्ये एक बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 48 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोटोग्राफीचे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून 60 हजार रुपये किंमतीचा कॅमेरा चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसमध्ये प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्या महिलेचे 39 हजार रुपयांचे दागिणे व रोख रक्कम चोरट्यांनी चोरीली आहे.
अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक हे 16 नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या भावजीच्या अंत्यविधीसाठी निजामाबादला गेले होते. 17 नोव्हेंबरला पहाटे त्यांचे बंद घर कोणी तरी फोडले होते. साडे तीन तोळे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 33 हजार 500 रुपये असा 1 लाख 48 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेले आहे. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब स्वामी अधिक तपास करीत आहेत.
संतोष दिगंबरराव मोरे यांचे छत्रपती चौकामध्ये जयगुरूदेव नावाचे फोटो स्टुडिओ दुकान आहे. 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता ते आपले दुकान बंद करून घरी गेले. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता त्यांच्या दुकानाच्या शर्टरचे कुलूप तोडल्याची महिती प्राप्त झाली. तेंव्हा त्यानी येवून तपासणी केली असता 60 हजार रुपये किंमतीचा कॅमेरा चोरीला गेला होता. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चन्ने अधिक तपास करीत आहेत.
आशिष शंकरराव बेरळीकर आणि त्यांची पत्नी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नांदेड बस स्थानक परिसरात आले. त्यांच्या पत्नीला हिंगोली येथे जाण्यासाठी ते बसमध्ये प्रवेश करून देण्याच्या गडबडीत असतांना कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या पर्समधील सोन्याचे दागिणे 33 हजार 500 रुपयांचे आणि 5 हजार 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 39 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे अधिक तपास करीत आहेत.
ममतानगरमध्ये घरफोडले; फोटो स्टुडिओ फोडले; बसस्थानकात चोरी