किनवट येथील पत्रकार मस्केचे खून प्रकरण; दोन मारेकऱ्यांना 28 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी; एक आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक

नांदेड(प्रतिनिधी)-14 ऑक्टोबर रोजी रात्री किनवट येथे पत्रकार सुरेश मस्केचा खून करणाऱ्या आरोपींना आठ दिवस मुक्काम करून पकडणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या सोबतच्या तीन सहकारी पोलीस अंमलदार अशा पथकाला 10 हजार रुपये रोख पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मासिक गुन्हा परिषदे दरम्यान दिले आहे.यावेळी अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार आणि जिल्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
14 ऑक्टोबर रोजी सुरेश दत्तात्रय मस्के याचा खून झाला होता. या संदर्भाने अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 245/2023 भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 सह ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास किनवटचे पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघणे यांच्याकडे होता. या गुन्ह्याची उकल होणे हा एक महत्वाचा प्रश्न पोलीसांसमोर होता. नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एका लेखी आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड आणि शेख कलीम यांना किनवटला पाठविले आणि हा गुन्हा उघडकीस आलाच पाहिजे असा आदेश दिला.
किनवटमध्ये राहून हे काम करणे तसेच खुप अवघड होते. कारण हत्या झालेले पत्रकार सुरेश मस्के यांची ख्याती खुप मोठी होती. त्यामुळे कोणी काही माहिती देत नव्हता. पण वेगवेगळ्या लोकांसोबत बोलून, स्थानिक किनवट पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेवून दत्तात्रय काळे यांनी अखेर या प्रकरणात शेख आवेज उर्फ अब्बु शेख सादुल्ला (22), शेख अशफाख शेख हसन (18) आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अश्या तिघांना पकडले. या कामासाठी दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने घेतलेली मेहनत नक्कीच प्रशंसा करण्यासारखी आहे. त्यांना किनवटचे पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, किनवटचे पोलीस निरिक्षक बी.जी.कऱ्हाळे, पोलीस उपनिरिक्षक सागर झाडे, पोलीस अंमलदार गजानन डुकरे आणि वर्षा धुर्वे यांनी केलेली मदत सुध्दा या प्रकरणाचा शेवट करण्यात महत्वाची होती.
पकडलेल्या तिघांपैकी दोन जणांना नांदेड इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी न्यायालयात हजर केले. कारण त्यातील तिसरा आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. या प्रकरणी सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी न्यायालयात तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी का आवश्यक आहे याचे सविस्तर विवेचन केल्यानंतर न्यायाधीश चंद्रशेखर मराठे यांनी पत्रकार सुरेश मस्केचा खून करणाऱ्यांना शेख आवेज उर्फ अब्बु शेख सादुल्ला (22), शेख अशफाख शेख हसन (18) या दोघांना 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.