
नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणने दोन वेगवेगळ्या कार्यवाही करत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून काही सोन्या-चांदीचे दागिणे आणि दोन चोरलेले मोबाईल जप्त केले आहेत. तसेच एका 22 वर्षीय युवकाकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाठविलेल्या प्रेसनोटनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, जाधव, शेख सत्तार, मुंडे, संतोष बेल्लुरोड, कलंदर, माने, तेजबंद आणि दासरे यांच्या पथकाने एका अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने चोरलेले दोन मोबाईल, सोन्याचे 5 ग्रॅम वजनाचे 33 मणी, दोन मोठे व दोन लहान मंगळसुत्र आणि चांदीच्या पायात घालायच्या चैन जोडी दोन असे साहित्य काढून दिले. या सर्व साहित्याची किंमत 36 हजार 500 रुपये आहे.
देगावचाळीत अनिल ग्यानोबा भोळे यांच्या घरी झालेल्या चोरीतील हा ऐवज आहे. त्या संदर्भाने वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 517/2023 दाखल आहे. अशा प्रकारे वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेला मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केला आहे. या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पुढील कार्यवाहीसाठी ऐवजासह वजिराबाद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दुसऱ्या एका घटने नांदेड ग्रामीण पोलीसांनी संशयीत म्हणून वैभव गणपतराव पिडगे (22) रा.अमृतनगर ता.पुर्णा जि.परभणी यास ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने चोरीच्या चार गाड्या काढून दिल्या. या गाड्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील एक गाडी आहे. ही कार्यवाही नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, जाधव, शेख सत्तार, मुंडे, संतोष बेल्लुरोड, कलंदर, माने, तेजबंद आणि दासरे यांनी पुर्ण केली. इतर गाड्या कुठून चोरीला गेल्या होत्या याची माहिती प्राप्त झाली नाही.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले आहे.