
नांदेड(प्रतिनिधी)-अवकाळी पावसाने नांदेड शहरासह जिल्ह्यात धुमाकुळ घातला असून यात जिल्ह्यातील 89 मंडळापैकी 12 मंडळात अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्याचे पशुधनही दगावल्याची घटना सोमवारी पडलेल्या पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान घटना घडली आहे. तसेच मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने आज दि.28 रोजीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
सोमवारी पहाटे 3 वाजेच्यासुमारास अवकाळी पावसाचा सुरूवात झाली. हा पाऊस तब्बल एक ते दीड तास वाऱ्या वादळासह जोरदार पाऊस बरसला यात एकंदरीत जिल्ह्यातील 89 मंडळापैकी 12 मंडळात पावसाने हाहाकार माजवला. तर किनवट तालुक्यातील पिंपरी येथे विज कोसळून शेतकऱ्याचे पशुधन असलेले म्हैश दगावले. तर दुसरीकडे हदगाव तालुक्यातील तामसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात हाल सोसवावे लागले. याचबरोबर जिल्ह्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आढळून आली. जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड शहर 68.00 मी.मी., लिंबगाव 99.00 मी.मी., तरोडा 89.30 मी.मी., नाळेश्र्वर 70.80 मी.मी.अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर 77.50 मी.मी., दाभड 69.00 मी.मी., कंधार तालुक्यातील उस्माननगर 76.30 मी.मी., लोहा तालुक्यातील सोनखेड 76.30 मी.मी., कलंबर 76.30 मी.मी., शेवडी 74.00 मी.मी. आणि हदगाव तालुक्यातील तामसा 65.30 मी.मी.तर पिंपळखेड 65.30 मी.मी. असा पाऊस या 12 मंडळात नोंदविला गेला आहे. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले असून यात गहु, हरभरा, ज्वारी आणि कापसाचेही नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले आहे.
याचबरोबर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने देखील 27 आणि 28 या दोन दिवशी नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केल आहे. यात आज दि.28 रोज मंगळवारी एक किंवा दोन ठिकाणी तासी 30 ते 40 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता दर्शवली आहे. तर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील मुंबई हवामान केंद्राने वर्तविली असल्यामुळे नांदेडकरांना सावधानतेचा इशारा म्हणून बाळगावा लागणार आहे.