नांदेड(प्रतिनिधी)- उत्तम कर्म हे चांगल्या भविष्याचा पाया आसतो. कर्म जर योग्य नसतील तर त्याच कर्माचे फळ आपणास आज ना उद्या चाखावेच लागतात. म्हणूनच “नेकी कर दरियामे डाल” हा माणुसकीचा संदेश देणारे “नेकी” नाटक महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सातव्या दिवशी नांदेड केंद्रावर सादर झाले.
सिद्ध नागार्जुना मेडिकल असोसिएशन, नांदेडच्या वतीने इरफान मुजावर लिखित, रागेश्री जोशी दिग्दर्शित सादर झालेल्या “नेकी” या नाटकाने स्पर्धेत चुरशीची लढत निर्माण केली. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. इराक, सिरीया या ठिकाणी जिहाद आणि जीहादिच्या नावखाली महिलांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांची हतबलता, त्यांचा संघर्ष दर्शवणारे दृश्य, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, वेशभूषा, रंगभूषा हे सर्वच ताकतीचे होते. एकाच खोलीत घडणारी कथा असतानाही दिग्दर्शकाने ते आपल्या कल्पकतेने त्याच्या चौकटी मोडत प्रेक्षकाना खुर्चीवर खिळवून ठेवले. हे नाटक सर्वच अंगाने ताकदीचे ठरले यात माधुरी लोकरे, गौतम गायकवाड, रागेश्री जोशी, डॉ. भारती मढवई, सपना वाघमारे, प्राजक्ता बोचकरी, डॉ. प्राजक्ता सराफ, राहुल मोरे, कपिल ढवळे, डॉ. रश्मी सग्नोर या सर्वांनी पात्रानुरूप भूमिका साकारल्या, श्याम डुकरे यांचे संगीत आणि श्याम चव्हाण यांच्या प्रकाशयोजनेणे नाटकाला एक वेगळी उंची निर्माण केली. रंगभूषा – कपिल ढवळे, वेशभूषा – शांती देसाई यांनी विषयानुरूप साकारली.
दि. २९ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी युवा फोरम परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित “दि अनॉनिमस” या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.