शिवाचार्यांनी निमंत्रण देऊ नये, निमंत्रण घ्यावे; कपिलधार येथे रंगला आरोप-प्रत्यारोपाचा फड

संगमेश्र्वर बाचे
नांदेड -बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री संत मन्मथ माऊली यांची भव्य यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने राज्यासह देशभरातील अनेक भागातून लिंगायत समाज लाखोंच्या संख्येने सहभागी होतो. या ठिकाणी शासकीय पुजा पार पडावी म्हणून राज्यातील अनेक शिवाचार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात जाऊन निमंत्रण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी शिवाचार्यांना पुजेसाठी येणार असे आश्र्वासन दिले असतांनाही मुख्यमंत्र्यांनी शिवाचार्यांच्या दिलेल्या आश्वासनाला कैराची टोपली दाखवून कपिलधारकडे पाठ फिरवली.
विरशैव लिंगायत समाजाच आराध्य दैवत असणाऱ्या मांजरसुंबा येथील कपिलधार हे तिर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आंध्र प्रदेश व इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात समाज भक्तीभावाने उपस्थित राहतो. एवढेच नसून या ठिकाणी तब्बल 140 च्यावर विविध भागातून पदयात्रा या ठिकाणी येत असतात. मात्र या ठिकाणी समाजाला गेल्या तीन-चार वर्षापासून वेगळच चित्र पाहावयास मिळत आहे. समाज ज्याच्या पाय्यावर मस्तक ठेवतो. तेच लोक दुसऱ्यांच्या पाय्यावर मस्तक ठेवून आपला उदोउदो करून घेत आहेत. लिंगायत समाज हा शिवाचार्यांना गुरू मानतो. त्यांची मनोभावे पुजा करतो. त्यांच्या पुजेसाठी तारीख घेतो पण हेच शिवाचार्य धर्माचे कार्य सोडून राजकीय लोकांच्या मागे लागून आपला उदो-उदो कसा करता येईल यात ते मागील काही महिन्यापासून व्यस्त झाल्याचे चित्र दिसून येते. मन्मथ स्वामींच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री यावे म्हणून 20 ते 25 शिवाचार्यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. ऐनवेळी मुख्यमंत्री का येवू शकले नाहीत हा विषय कळू शकला नसला तरी एकाच ठिकाणी एकाच समाजाच्या एकाच दिवशी दोन सभा होणे म्हणजे समाजाची खऱ्या अर्थाने अदोगती होणे असे समाजातील काही जण बोलत आहेत.या दोन्ही व्यासपीठावरून एकमेकांचे उणेदुणे काढण्याचा कार्यक्रम समाजाच्या समोर झाला. काही जणांनी शिवाचार्यांवर टिका केल्या तर दुसऱ्या व्यासपीठावरून संघटनेच्या नेत्यांवर टिका केल्या खऱ्या आर्थाने संघटनेच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागले. हे मात्र सत्य नाकारता येणार नाही. खऱ्या अर्थाने धर्मगुरूंचे काम हे कोणत्याही राजकीय मंडळीच्या जवळ न जाणे, राजकीय मंडळींना आमच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती लावावी अशी विनंती करण्यासाठी त्यांच्या दारात जाणे ही समाजाला खटकणारी बाब आहे.
लिंगायत समाजात शिवाचार्यांना सर्वश्रेष्ठ स्थान आहे. त्यांची पादपुजा करून तिर्थही घेतल जात पण आज समाजातील शिवाचार्य हे धर्माचे कार्य सोडून राजकीय कार्यात अधिक गुंतले आहेत. काही जणांना तर खासदारकी आणि आमदारकीचे ढवाळे लागले आहेत. मात्र अशा शिवाचार्यांना समाज कदापीही माफ करणार नाही. शिवाचार्यांनी आपली जागा ओळखून धर्माचे कार्य करावे अन्यथा समाज त्यांना मठातून बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा गंभीर इशारा समाजातीलच नागरीकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *