मागण्या मान्य न झाल्यास 1 जानेवारी 2024 पासून बेमुदत वितरण बंद
नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वपूर्ण घटक असून राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणारा स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वाचा घटक ठरत आहे. राज्यात आणि देशात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरु झाल्यापासून राज्यातील परवानधारक दुकानदार त्रस्त झाले आहेत. वितरण व्यवस्थेतील अनेक अडचणी आणि स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन अद्याप मिळाले नसल्यामुळे दि. 1 डिसेंबर 2023 रोजी ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली, या संघटनेशी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. 1 जानेवारी 2024 पासून बेमुदत वितरण बंद करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
सदर संघटनेतर्फे स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी आणि मागण्यांबाबत वेळोवेळी निवेदन देऊन, धरणे आंदोलने करण्यात आली परंतु अद्याप याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन या संघटनेची सलग्नीत असलेल्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्यावतीने दि. 1 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूर अधिवेशन काळात नागपूर येथे आंदोलन, 1 जानवारी 2024 पासून राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात राज्यव्यापी व देशव्यापी महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बेमुदत बंद, 16 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे रामलिला मैदानावरुन संसद भवनावर देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर यांनी दिली.