नांदेड (प्रतिनिधी) – ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे संपन्न होत आहे. हि स्पर्धा आता उत्तरार्धात पोहोचली आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत एकूण दहा सरस नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. स्पर्धेच्या नवव्या दिवशी राजीव गांधी युवा फोरम परभणीच्या वतीने संजय पांडे निर्मित, अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित “दि अनॉनिमस” या नाट्य प्रयोगाचे उत्तम सादरीकरण झाले.
अनॉनिमस म्हणजे अनामिक, निनावी आणि अज्ञात. सदर नाटक अज्ञात या अर्थाने लिहिण्यात आले आहे. मानवी मुलभूत भावनांचा, कृत्यांचा, घडणार्या अज्ञात घटनांच्या माध्यमातून या नाटकात मानवी कर्माचा वेध घेण्याच प्रयत्न करण्यात आला आहे .
यात जरासंध ची भूमिका डॉ. सिद्धार्थ मस्के, भीमा- अतुल साळवे, छाया- सोनी मुलंगे, जीवा- समीर हाणमंते, देवा- पंडित तूपसामिंद्रे, मोहन आणि पांडूची भूमिका प्रकाश बारबिंड यांनी उत्तम साकारली.
वास्तववादी नेपथ्य अनिल साळवे आणि अमोल साळवे यांनी साकारले तर प्रकाश योजना नारायण त्यारे आणि सुरज त्यारे यांनी आशयानुरूप साकारले, रंगभूषा – अनंत जोशी, प्रथमेश जोशी, वेशभूषा – अनिल पांडे, अंजली कुलकर्णी,संगीत- दिनेश नरवाडे, गोविंद मोरे, रंगमंच व्यवस्था- दिनकर जोशी, बंडू जोशी, शैलेजा पांडे, निर्मला जोशी, यश उजगरे, यश मुलंगे, शुभम मुलंगे यांनी साकारले.
आज दि. ०१ डिसेंबर रोजी तन्मय ग्रुप नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित “कथा मुक्तीच्या, व्यथा मातीच्या” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.