नांदेड(प्रतिनिधी)-वाघी-नाळेश्र्वर रस्त्यावर जाणाऱ्या एका व्यक्तीला लुटून त्याच्याकडून 14 हजार 250 रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना अटक करून स्थानिक गुन्हा शाखेने त्या दरोडेखोरांकडून 29 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल 24 तासाच्या आत जप्त केला आहे.
शिवप्रसाद बापूराव देशमुख हा 23 वर्षीय युवक 30 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 10.30 या वेळेदरम्यान नाळेश्र्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून नेहमीप्रमाणे आपल्या पिंपरण या गावाकडे जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.के.5727 वर तीन अनोळखी व्यक्ती आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ओम, बोटातील अंगठी, रोख रक्कम असा 14 हजार 250 रुपयांचा ऐवज लुटून नांदेडकडे पळून गेले. या प्रसंगी पळून जातांना सुगाव येथील नागरीकांनी त्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतू ते त्यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 34 आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 162/2023 दाखल झाला.
याप्रकरणी समांतर तपास करतांना स्थानिक गुन्हा शाखेने 24 तासात शेख रिजवान शेख अब्दुला (21) रा.खडकपुरा नांदेड, शेख सलमान शेख निसार (19), शेख साहील अब्दुल सत्तार (21) दोघे रा.तेहरानगर नांदेड यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी शिवप्रसाद देशमुखला लुटल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून पोलीसांनी सोन्याचे पान, चांदीची अंगठी आणि मोबाईल असा 29 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेने या चोरट्यांना पुढील तपासासाठी लिंबगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
या प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, गुंडेराव कर्ले, देवा चव्हाण, मोतीराम पवार, गजानन बैनवाड आणि गंगाधर घुगे यांनी परिश्रम घेत या तिन चोरट्यांना पकडले आहे.
नाळेश्र्वर-वाघी रस्त्यावर दरोडा टाकणारे तीन चोरटे स्थानिक गुन्हा शाखेने पकडले