नांदेड,(प्रतिनिधी)- एका वाड्याला घराची, देशाची संकल्पना देत त्यामध्ये वावरणाऱ्या वृत्ती ह्या खोल्या स्वरूपात दाखवून पूर्णत्व आणि अपूर्णत्व यामध्ये देश कसा विकसित स्वप्न साकारेल याचा अनुत्तरीत प्रश्न म्हणजे “खंडहर” हे नाटक होय. विचारसरणी, तत्व, उद्देश जेंव्हा दूर सरकतात आणि त्याची जागा स्वार्थ, सत्ता हे घेतात तेंव्हा देशाचे खंडहर होते, अशा भावना असलेले भावनाट्य महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर सादर झाले. बालगंधर्व सांस्कृतिक काला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने संकेत पांडे निर्मित, रविशंकर झिंगरे लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित हे नाटक पाहण्यासाठी भर पावसातही नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली.
या नाटकात सुनील ढवळे, रवी पुराणिक, चैतन्य अंबेकर, मनीषा उमरीकर, मधुकर उमरीकर, कौशिक कण्व, श्रयश महेंद्रकर, उपेंद्र दुधगावकर, सचिन संघई, संजना नागठाणे, प्रा. डॉ. सुरेश शेळके, यशवंत मकरंद, सॅन्डी राठोड, अनिकेत शेंडे यांनी भूमिका साकारल्या.
सूचक आणि आशयपूर्ण नेपथ्य श्रद्धा वडसकर आणि सरोज पांडे, संगीत– उपेंद्र दुधगावकर आणि त्याम्बक वडसकर, प्रकाश योजना– मनोज शेळगावकर आणि विक्रम परळीकर, रंगभूषा – अलका पांडे आणि योगेश पांडे, वेशभूषा- अबोली जोशी आणि महेश जोशी, अभिजित सराफ, नंदकुमार टाकळकर, अनिकेत सराफ, रंगमंच सहाय्य- नीता जोशी, काशिनाथ चंदापुरे, अरुण गोरेगावकर, आनंद पुराणिक, उदय कात्नेश्वरकर आणि हरिहर बुचाले यांनी सांभाळली.
आज दि. २ डिसेंबर रोजी स्पर्धेतील शेवटचे नाटक झपूर्झा सोशल फाउंडेशन, परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित ऐश्वर्या डावरे दिग्दर्शित “चिरंजीवी” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.