नांदेड(प्रतिनिधी)-सकल ओबीसी समाजाच्यावतीने नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा राज्यातील एल्गार महामेळावा घेण्याचा निर्णय दि.3 डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत पार पडला. याबाबत लवकरच मेळाव्याचे ठिकाण आणि तारीख जाहीर करणार असल्याची माहिती या मेळाव्यात सांगण्यात आली.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येणार असल्याने राज्यातील ओबीसी समाज जागृत झाला आणि राज्यात ठिक-ठिकाणी ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन सुरू झाले. पहिला ओबीसी एल्गार मेळावा जालना जिल्ह्यातील आंबड येथे पार पडला. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे विराट ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. यानंतर आता तिसरा ओबीसी एल्गार महामेळावा नांदेड जिल्ह्यात होणार आहे. या संदर्भाची प्राथमिक बैठक नांदेड शहरात पार पडली. या बैठकीला ओबीसी समाजातील जवळपास 40 ते 50 जातीतील लोकांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने हा मेळावा कुठे घेतला जावा, या मेळाव्याची तयारी या अनुषंगाने तब्बल 4 ते 5 तास या बैठकीत चर्चा झाली.
ना.छगन भुजबळ, विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार, प्रकाशअण्णा शेंडगे, माधव जानकर, नाना पटोले, गोपीचंद पडळकर यांच्यासह आदी नेते ओबीसी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण दिल जाणार आहे. त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. या मेळाव्यासाठी जी तारीख मिळेल त्या तारखेनुसार नांदेड जिल्ह्यातील ओबीसी एल्गार हा मेळावा अतिविराट करण्याच्या अनुषंगाने सर्व ताकतीनिशी जिल्ह्यातील ओबीसी समाज या मेळाव्या उतरणार आहे. हिंगोली येथील यशस्वी मेळावा पार पडल्यानंतर राज्यातील तमाम ओबीसी समाजात नवचैतन्य निर्माण झाल आहे. आज प्रत्येक तळागळातील ओबीसी माणुस, कार्यकर्ता हा पेटून उठला आहे. कारण त्यांच्या हक्काच आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ आरक्षणच नसून भविष्यात त्यांच्या राजकीय वाटचालीवरही गदा येणार आहे. यामुळे आज तळागळातील ओबीसी समाज हा या एल्गार मेळाव्यासाठी जागृत झाला. यामुळे नांदेड जिल्ह्यातील ओबीसी एलगर मेळावा हा भव्यदिव्य होणार. या मेळाव्यासाठी किमान पाच लाखांच्यावर ओबीसी समाज सहभागी होणार असल्याचा आत्मविश्र्वास रविवार पार पडलेल्या बैठकीतून व्यक्त करण्यात आला आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील 200 च्या जवळपास कार्यकर्ते उपस्थित होते. विशेषत: प्रत्येक जातीतील कार्यकर्ते या बैठकीला आवर्जुन उपस्थित असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ओबीसी एल्गार मेळावा हा नक्कीच सर्वात मोठा मेळावा होणार असल्याचा आशवादही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
नांदेडमध्ये ओबीसींचाही एल्गार मेळावा