
नांदेड(प्रतिनिधी)-21 नोव्हेंबर रोजी माळाकोळी परिसरात एका महिलेला मारहाण करून तिचा ऐवज लुटणाऱ्या दोन पैकी एका चोरट्याला माळाकोळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी गजाआड केले आहे. मारहाण झालेली महिला उपचारादरम्यान मरण पावली. या चोरट्याला पकडल्यानंतर अनेक जिल्ह्यातील गुन्हे उघडकीला आलेले आहेत अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांची उपस्थिती होती.
21 नोव्हेंबर रोजी विमलबाई चव्हाण या वयस्कर महिलेला मारहाण करून त्यांचे दागिणे लुटून नेण्यात आले होते. या संदर्भाने माळाकोळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 397, 457, 336, 34 नुसार गुन्हा क्रमांक 178/2023 दाखल करण्यात आला होता. पुढे विमलबाई चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हणून या गुन्ह्यात कलम 302 ची वाढ करण्यात आली आहे.
आज दि.3 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या माहितीनुसार माळाकोळी येथील विमलबाई चव्हाण या महिलेचा खून करणारा एक आरोपी कुरूळा येथून कंधारकडे येत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर माळाकोळी पोलीसांची मदत घेवून पोलीस पथकाने संगमवाडी फाटा ता.कंधार येथे सचिन उर्फ बोबड्या बाबूराव भोसले (27) रा.कुरुळा ता.कंधार ह.मु.ताडपांगरी जि.परभणी यास ताब्यात घेतले. सचिनने दिलेल्या माहितीनुसार त्याने आणि त्याचा भाऊ धनंजय भोसले यांनी मिळून विमलबाई चव्हाणला लुटले होते. तसेच पोलीस ठाणे लोहा अंतर्गत एका आखाड्यावर दरोडा टाकला होता, लातूर येथून मोटारसायकल चोरली होती. तसेच पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माळाकोळीसह लोहा, जळकोट येथील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या चोरट्यांनी पिंपळदरी जि.परभणी, कळमनुरी जि.हिंगोली, कुरूंदा जि.हिंगोली, बरदापुर जि.बीड येथील चोरी प्रकरणांमध्ये हे आरोपी हवे आहेत. पुढील तपासासाठी पकडलेल्या सचिन उर्फ बोबड्या बाबुराव भोसलेला माळाकोळी पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
याप्रसंगी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे सांगत होते या माळाकोळी प्रकरणातील फिर्यादीने इतर लोकांवर संशय व्यक्त केला होता. त्याही अनुशंगाने तपास करण्यात आला. या चोरट्यांनी अनेक गुन्हे घडवलेले आहेत, अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे नेटवर्क आहे. चोरी प्रकरणातील कलम 457, 380 मध्ये लवकरच जामीन मिळतो त्या आधारावर हे तुरूंगातून बाहेर येतात आणि पुन्हा चोऱ्या करतात.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय केंद्रे, मारोती तेलंग, गुंडेराव कर्ले, हनुमंत पोतदार, देवा चव्हाण, गजानन बैनवाड, मारोती मोरे, धम्मा जाधव, ज्वालासिंग बावरी, बजरंग बोडके, गंगाधर घुगे, सायबर सेलचे राजू सिटीकर, दिपक ओढणे, व्यंकटेश सांगळे, रेशमा पठाण आदींचे कौतुक केले आहे.
