नांदेड(प्रतिनिधी)-अंगणवाडी कर्मचारी असणाऱ्या सेविका आणि मदतनिस यांना किमान वेतनापेक्षाही कमी स्वरुपाचे मानधन मिळते किमान सेविकेला 26 हजार आणि मदतनिसला 22 हजार रुपये मानधन देण्यात यावे याचबरोबर शासनाकडून असलेल्या प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे 4 डिसेंबरपासून राज्यव्यापी बंद संप पुकारण्यात आलेला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत. तोपर्यंत हा संप चालूच राहणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिली.
4 डिसेंबरपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका-मदतनिस ह्या बेमुदत संपावर आहेत. यात जिल्ह्यातील 3 हजार 997 सेविका तर 2 हजार 649 मदतनिस या संपात सहभागी झाल्या आहेत. यांच्याकडून 26 हजार रुपये सेविका आणि 22 हजार रुपये मदतनिस यांना मानधन देण्यात यावे याचबरोबर पेन्शन योजना लागू करावी, दैनंदिन कामासाठी नवीन मोबाईल देण्यात यावा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, छापील रजिस्टर व मानिसक अहवाल उपलब्ध करून देण्यात यावे तसेच 30 दिवसांची भर पगारी आजारपणाची रजा देण्यात यावी. यासह विविध मागण्या घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दि.4 रोज सोमवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत हा संप असाच सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.