नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरी “चिरंजीव” या नाटकाने संपन्न झाली. स्पर्धेच्या बाराव्या दिवशी विनोद डावरे लिखित, ऐश्वर्या डावरे दिग्दर्शित “चिरंजीव” हे नाटक झपूर्झा सोशल फौंडेशन परभणीच्या वतीने सादर झाले.
पुराणातल्या कथा किंवा दंतकथा खर्या असल्याच्या मानल्या जातात. त्या पुराणात सात व्यक्ती या अमर किंवा चिरंजीव मानल्या गेल्या किंवा तशी मान्यता प्राप्त आहे. या सात चीरंजीवांवर आधारित कथा म्हणजे “चिरंजीव” हे नाटक होय.
नाटकाच्या सुरवातीला एक मुलगी आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून रंगमंचावर येते. तिथे तिची भेट होते ती या सप्त चीरंजीवांशी. तिचे रक्षण करायचे म्हणून एक एक जन एक एक तास वाटून घेतात. या प्रत्येका सोबतच्या एकांतात ती मुलगी ते चिरंजीव असल्याचे त्यांच्याच तोंडून वदवून घेते. आता ती मुलगी म्हणजे नेमक कोण? हे नाटक पाहताना स्पष्ट होते.
या नाटकात ऐश्वर्या डावरे यांनी आपला आवाजाची पोत, उच्चारण, भावना, यांचा मेळ करत साकारलेली मुलीची भूमिका लक्षवेधी ठरली. तर रवी- संकेत गाडेकर, सोम- महेश जोशी, मंगळ- विनोद डावरे, बुध- पृथ्वीराज देशमुख, गुरु- स्वराज पवार, शुक्र- महेश रोडे, शनी- अमोल गोरकट्टे, सहकलाकार – अमोघ जोशी, कैलास वैद्य, सिद्धी बेंडे, समृद्धी बेंडे, यादव लोखंडे, सचिन वांगे यांनी आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला.
प्रकाशयोजना- बालाजी दामुके, नेपथ्य- मोहन भले, संजय भराडे, संगीत – मयंक परळीकर, सारंग भोळे, रंगभूषा – सुभाष जोशी, मनोहर घोरपडे, वेशभूषा- गौतम घोडके, हरिभाऊ कदम, यांनी साकारली.
तब्बल बारा दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकापेक्षा एक अश्या सरस नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले. याच केंद्रावरील पुढील बारा नाट्य प्रयोग दिनांक ०४ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत लातूर येथे सादर होणार आहेत व त्यानंतर एकूण चोवीस नाटकामधून एकत्र निकाल घोषित होईल असे स्पर्धा समन्वयक दिनेश कवडे यांनी कळवले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अनेक रसिक प्रेक्षकांनी बारा दिवस उत्तम नाटक पाहता आल्याचे समाधान व्यक्त करत सभागृहात उपस्तीत सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे सहायक संचालक श्रीराम पांडे आणि स्पर्धा समन्वयक दिनेश कवडे यांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धा यशस्वीतेसाठी सह समन्वयक किरण टाकळे, सुधांशू सामलेट्टी, सेजल क्रिपलानी, स्थानीक सर्व रंगकर्मी यांनी परिश्रम घेतले.