काही तासाच्या अंतरात दोन दरोडे टाकणाऱ्या टोळीला दुहेरी जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये काही तासाच्या अंतरात दोन दरोडे टाकणाऱ्या सहा जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी दुहेरी जन्मठेप आणि प्रत्येकाला 20 हजार रुपये रोख दंड असा एकूण 1 लाख 20 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
दि.8 जुलै 2020 रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास आकाश हा आपल्या भावासोबत दुचाकी गाडीवर लालवाडी तांडा ता.कंधार येथून झुनझुनवाडी ता.कळमनुरी जि.हिंगोलीकडे जात असतांना नांदेड-सोनखेड रस्त्यावर लक्की पेट्रोलपंपाजवळ ते आले असतांना दोन दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी त्यांना थांबवले त्यावेळी दुसऱ्या एका दुचाकी क्रमांक एम.एच.26 वाय.3080 वर काही जण आले. या सर्वांनी मिळून आकाशच्या भावावर चाकुने हल्ला करून त्याच्या मांडीवर जखमी केले. त्यांच्याकडील पेनड्राईव्ह, आधार कार्ड, मतदान कार्ड, बॅंक ऑफ इंडियाचे पासबुक, एटीएम कार्ड, एक्सेस बॅंकेचे पास बुक, क्रेडीट कार्ड, मोबाईल आणि 2500 रुपये रोख रक्कम बळजबरीने लुटले.
अशीच एक दुसरी घटना 9 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजता घडली. याबाबत चॉंद पाशा अब्दुल हफीज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मुळ रा.देगलूर नाका येथील आहेत. तेंव्हा त्यांना फोन आला. फोन करणारा भागवत पाटलोबा दराडे रा.मांडवा ता.परळी जि.बीड हा होता. त्याने सांगितले मी तुमच्याकडे हिरवी मिर्ची भरलेला टॅम्पो घेवून येत असतांना मला मुस्लमानवाडी ते विद्यापीठ रस्त्यावर आमचा टॅम्पो खराब झाला म्हणून दुसऱ्या टेम्पोमध्ये मिर्चीचे पोते भरत असतांना 25 ते 32 वयोगटातील 6 जण तेथे आले आणि खंजीरचा धाक दाखवून त्यांनी आमच्या खिशातील आणि गाडीच्या डिक्कीमधील 55 हजार 150 रुपये लुटले. लुटणाऱ्यांच्या एका दुचाकीचा नंबर एम.एच.26 वाय. 3080 असा होता. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 520/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 395प्रमाणे दाखल झाला. या गुन्ह्यात तत्कालीन पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात, गोविंद खैरे, शेख असद यांनी सविस्तर तपास करत विकास सुभाष हाटकर(26), राजेंद्र उर्फ राजू हंबर्डे (32), प्रभाकर चिमनाजी थोरात (23), ईश्र्वर मारोतीराव हंबर्डे(22), दत्ताहरी हंबेर्डे (24), अनिकेत नाईकराव हंबर्डे (26) अशा सहा दरोडेखोरांची नावे निष्पन्न केली.
यातील काही आरेापी दोषारोप पत्र दाखल करेपर्यंत फरार होते. नंतर त्यांच्या विरुध्द पुरवणी दोषारोपपत्र आले. जिल्हा न्यायालयात हा सत्र खटला क्रमांक 11/2021 प्रमाणे चालला. या प्रकरणात एकूण 15 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुरावाआधारे न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी दोन दरोडे टाकणाऱ्या या सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकास 10 हजार रुपये रोख दंड असा एकूण दोन प्रकरणात 1 लाख 20 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनुराधा कोकाटे यांनी बाजू मांडली. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी आणि चंद्रकांत पांचाळ यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *