
नांदेड,(प्रतिनिधी)- सायकलवर प्रवास करून रेकी करत चोरी करणारा चोरटा शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने जेरबंद केला असून 32.5 तोळे वजनाचे 16 लाख 28 हजार रुपयांच्या किमतीचे सोन्या चांदीचे दागिन्यां पैकी त्याच्याकडून 15 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी वसंत नगर भागातील एक कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत देव तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 32.5 तोळे वजनाचे 16 लाख 28 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. 22 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली शिवाजीनगर पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना 20 नोव्हेंबर रोजी रात्री 1.30 वाजता एक व्यक्ती सायकलवर त्या भागात फिरत असताना दिसला. दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये त्या व्यक्तीच्या सायकलला दोन पिशव्या लटकवून तो परत जात असताना दिसला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरी संदर्भात गुन्हा क्रमांक 420/2023 दाखल झाला होता. याबाबतचा तपास करताना शिवाजीनगर पोलिसांनी मानवी कौशल्य शक्तींच्या आधारावर तपास करत महबूबनगर नांदेड येथील राजू बाबुराव गायकवाड (34) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच तोळे वजनाच्या पाटल्या, पाच तोळे वजनाच्या बांगड्या, तोडे, नेकलेस, मिनी गंठण, गळ्यातील साखळी, ओम चैन, तीन अंगठ्या, मंगळसूत्र, कर्णफुले आणि चांदीचे काही दागिने असा 15 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. चोरी करताना चोरट्याने वापरलेली 7 हजार रुपये किमतीची सायकल सुद्धा जप्त करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी एवढ्या मोठ्या चोरीचा तपास वीस दिवसात लावून प्रशंसनीय काम केले आहे. या चोरीतील चोरी गेलेले जवळपास सर्व साहित्य ज्या स्वरूपात चोरीला गेले होते त्याच स्वरूपात जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनात या चोरीचा छडा लावणारे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अजहर, लिंबाजी राठोड, अंकुश लंगोटे, दत्ता वडजे बाळकृष्ण मुरकुटे यांचे कौतुक केले आहे.