कंधार,(प्रतिनिधी)- आपल्या घरात नेहमी येणे जाणे असणारा व्यक्ती चोरटा असू शकतो ही कल्पनाच केली जाऊ शकत नाही. परंतु कंधार येथे एक व्यक्ती आपल्या उपचारासाठी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून 27 लाख 50 हजार रुपये रोख रकमेची चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हा शाखेने संपूर्ण रकमेसह जेरबंद केला आहे.
कंधार येथील मोहम्मद युसूफ खान हे हैदराबाद येथे आपल्या उपचारासाठी गेले असताना त्यांच्या बंद घराचा फायदा घेत कोणीतरी चोरट्यांनी त्यांच्या शयनकक्षाचा कडीगोंडा तोडून त्यातून 27 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबतचा गुन्हा 7 नोव्हेंबर 2023 रोजी दाखल झाला होता.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद युसुफ खान यांच्या घरी नेहमी येणे जाणे असणारा मोईन महबूब जानी शेख राहणार छोटी गल्ली कंधार यानेच ही चोरी केली असावी अश्या संशयावरून या संदर्भाने त्याच्याकडे विचारपूस केली असतांना एक महिन्यापूर्वी मोहम्मद युसुफ खान उपचारासाठी हैदराबाद येथे गेले असताना मीच ती 27 लाख 50 हजार रुपये रोख रकमेची चोरी केली अशी कबूली दिली. संपूर्ण 27 लाख 50 हजार रकमेसह स्थानिक गुन्हा शाखेने मोईन महबूब जानी शेख यास जेरबंद केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराय धरणे, पोलीस उप अधीक्षक कंधार थोरात यांच्या मार्गदर्शनात चोरीचा गुन्हा उघड करण्याची कामगिरीसाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, गोविंद मुंडे, पोलीस अंमलदार संजयजी केंद्रे, गंगाधर कदम, गुंडेराव करले, देविदास चव्हाण, कंधार येथील सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर,महिला पोलीस अंमलदार कांबळे यांचे कौतुक केले आहे.