नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 नोव्हेंबर रोजी सिडको येथील सराफा भागातून 3 लाख 69 हजार 625 रुपयांचा ऐवज असलेली बॅग घेवून पळालेल्या दोन पैकी एका चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने ओडीसा राज्यातून पकडून आणले आहे. त्या लोकांनी मिळून नांदेड येथे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ओडीसा राज्यात ज्या गावात आरोपीला पकडले त्या गावात नागरीकांनी पोलीसांवर हल्ला सुध्दा केला अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.याप्रसंगी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय त्यांचे अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
दि.24 नोव्हेंबर रोजी शिवाजी चंद्रकांत डहाळे हे सराफा व्यापारी आपली दुकान तुळजाई ज्वेलर्स उघडत असतांना दुकानाजवळ ठेवलेली सोने-चांदी आणि रोख रक्कमेची बॅग एका चोरट्याने पळवली. दुसरा चोरटा दुचाकी घेवून त्याची वाट पाहत होता. ते दोघे दुचाकीवर फरार झाले. त्या बॅगमध्ये एकूण 3 लाख 69 हजार 625 रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 839/2023 दाखल झाला होता.
ही चोरी उघड व्हावी म्हणून नांदेड ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक मेहनत घेत होते. सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्या सोबत पोलीस अंमलदार पद्मसिंग कांबळे, संजीव जिंकलवाड, शेख कलीम, दिपक ओढणे, राजू सिटीकर, मारोती तेलंग, गुंडेराव कर्ले, सुरेश घुगे, देवा चव्हाण, गजानन बैनवाड, ज्वालासिंग बावरी, हनुमानसिंह ठाकूर, संग्राम केंद्रे मारोती मोरे, धम्मानंद जाधव यांनी तांत्रिक दृष्ट्या आणि सर्वसामान्य पध्दतीने याची माहिती घेतली असता अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या दोन चोरट्यांना शोधले. ते चोरटे यावेळेस साई प्लॅस लॉज डॉक्टर्सलेन येथे थांबले होते. पुर्वी त्यांनी दत्तनगर भागात भाड्याने घरपण घेतले होते. या आरोपींनी आपले दुचाकी वाहन रेल्वेने नांदेडमध्ये आणले होते आणि त्यावरून ती चोरी केली होती. तेलंगणा, आंध्र-प्रदेश आणि ओडीसा राज्यात या तपास पथकाने अनेक जागी यासंबंधाची माहिती घेत ओडीसा राज्यातील दाहीसाही, मुंडामल, व्यासनगर, जाजपूर रोड, जिल्हा जाजपूर हे गाव गाठले. या गावात दिपक ईसफुल प्रधान (21) या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. ज्यामध्ये दोन पोलीसांना मार लागला आहे.
या आरोपींनी अर्धापूर येथील गुन्हा क्रमांक 405/2023 सुध्दा मी आणि माझ्या साथीदारांनी केले असल्याचे कबुल केले आहे. इतर आरोपींना आम्ही लवकरच जेरबंद करू असे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले. या एका आरोपीला पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस अधिक्षकांनी 20 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे.