नांदेड(प्रतिनिधी)-आरोग्य मित्र म्हणून सेवा देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील 63 आरोग्य मित्र आणि कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉ.दिपेश शर्मा यांना निवेदन दिले.
नांदेड जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजना आणि राज्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉ.दिपेश द्वारकादास शर्मा हे आहेत. त्यांच्या सोबत 63 आरोग्य मित्र आणि कर्मचारी काम करतात. या सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी, जिल्हा समन्वयक आणि जिल्हाप्रमुख यांना निवेदन सादर करून मागणी केली आहे की, आम्ही मागील 11 वर्षापासून आरोग्य मित्र म्हणून काम करतो. आम्हाला कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ दिला जात नाही.कोवीडमध्ये काम करून सुध्दा आमच्या कामाचा मोबदला आम्हाला दिला नाही. आमच्याकडून तुटपूंज्या मानधनावर काम करून घेतले जाते.
आम्ही ज्या योजनेअंतर्गत काम करत आहोत त्या कंपनींकडे आमच्या मागणीचे पत्र पोहचविण्याचे बरेच प्रयत्न केले. पण आमची काही दखल घेतली नाही. सध्या आम्हाला 11 हजार 465 रुपये एवढे मानधन मिळते. एवढ्याशा पगारात आम्ही आमच्या कुटूंबाचा उर्दहनिर्वाह कसा करावा हा प्रश्न आहे. आयुष्यमान योजनेचे काम आम्ही सप्टेंबर 2018 पासून करत आहोत. आम्हाला आयुष्यमान मित्राच मानधन देण्यात येईल अस मिटींगमध्ये सांगितल जात परंतू त्याची अंमलबजावणी होत नाही. असे कार्ड बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8 रुपये प्रति कार्ड असे मानधन दिले जात आहे. परंतू ते आम्हाला मिळत नाही. धुळे येथे आरोग्य मित्रांनी केलेल्या बंदला आमचा पाठींबा आहे. टी.पी.ए.कंपनीने लवकरात लवकर सकारात्मक भुमिका घेवून योग्य त्या निर्णयापर्यंत पोहचावे नाही तर आम्हाला संवैधानिक लढा देण्यासाठी बंध पुकारावा लागेल. असे निवेदनात लिहिले आहे.
आरोग्य मित्र आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मासिक वेतन 25 हजार रुपये द्यावे. आमच्या काम करण्याच्या आदेशावर भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असा उल्लेख करावा. ईएसआयसी ई-ओखपत्रातील त्रुटी दुरूस्त करण्यात याव्यात. सन 2012 पासून ते 2021 पर्यंतचे आम्हाला वाढीव कामाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. सन 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वार्षिक वेतनात दरवर्षी वाढ व्हावी. तसेच समान काम समान वेतन मिळावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.