फुले शाहू -आंबेडकर – अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला: पुष्प दुसरे
नांदेड (प्रतिनिधी) -सध्याच्या काळात भारताचा पत्ता नेमका कोणता आहे अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे, भारताचा मूळ चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा स्थितीत गांधी,नेहरू, आंबेडकरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ‘आयडिया ऑफ इंडिया’ हेच आपल्या भारताचे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक तथा पत्रकार संजय आवटे यांनी केले.
नांदेडच्या कल्चरल असोसिएशनच्या वतीने कुसुम सभागृहात आयोजित फुले-शाहू -आंबेडकर -अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्याख्यानाचा विषय ‘वादळ वणव्यात एकच दीपस्तंभ : भारतीय संविधान’ होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार प्रा.दत्ता भगत होते. यावेळी मंचावर कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र गोणारकर, सचिव डॉ. विजयकुमार माहुरे, डॉ.पंडित सोनाळे, इंजि. अनिल लोणे, सत्कारमूर्ती भुजंग कसबे उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय आवटे म्हणाले , विविधतेतून आकारास आलेल्या भारत नावाच्या देशाची एकता भारतीय संविधानाने सुंदर गुंफून ठेवली आहे.पण सध्या विकासाचा फार्स निर्माण केला जातोय ,भारतीय संविधानिक मूल्याची पायमल्ली केली जाते आहे , हा असा काळ आहे ज्या काळात भारताचा डीपी हरवत चालला आहे. तो डीपी योग्य लावणे अत्यावश्यक आहे, महापुरुषांचे अपहरण केले जात आहे. कुणाची सत्ता गेली याच्या दुःखापेक्षा जनतेची सत्ता जात आहे याचे दुःख अधिक आहे. अशा स्थितीत आपण भारतीय नागरिक म्हणून जागरूक असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले..
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक दत्ता भगत म्हणाले, भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया ही संविधान सभेच्या निर्मितीपासून सुरू झाली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये याची कल्पना 1919 पासूनच आकाराला येत होती. प्रौढ मताधिकार, वंचितांना प्रतिनिधित्व, लोकशाही हेच डॉ.आंबेडकर यांच्या चळवळीचे सूत्र होते. त्यांच्या वैश्विक जीवनदृष्टीमुळे संविधानाला अधिक मौलिकता लाभली आहे.
म.फुले,राजर्षी शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व्याख्यानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील स्मृतिशेष अशोक नवसागरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा माथाडी कामगार संघटनेचेज्येष्ठ कार्यकर्ते भुजंग कसबे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार माहूर यांनी केले. डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर प्राध्यापक डॉक्टर पंडित सोनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोतराव धतुरे,तुकाराम अटकोरे,इंजि.डी. डी. भालेराव,इंजि.अनिल लोणे, अरुणा नरवाडे, विमल नवसागरे, डॉ. मंदाकिनी माहुरे, विमल शेंडे, शंकरराव शिरसे,डॉ. गजानन ढोले, विजय डोंगरे, सत्यपाल नरवाडे, श्री गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.