जरांगे पाटील यांच्या सभेला उशीर झाला म्हणून बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी पोलीसांनी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सभा ठेवून सुचनांचे पालन न करणाऱ्या बारड येथील दहा जणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार नितीन विठ्ठलराव गंगलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. ही सभा रात्री 10 वाजेपर्यंत संपायला हवी होती. परंतू ही सभा रात्री 10.50 वाजेपर्यंत सुरू होती. यामुळे निर्धारीत वेळेच्या व्यतिरिक्त जास्त वेळ सभा सुरू राहिली. त्यामुळे पोलीसांच्या सुचनांचे उल्लंघन झाले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे सुध्दा उल्लंघन झाले. या गुन्ह्यात बारड येथील बाळासाहेब उर्फ राजाराम शंकरराव देशमुख बारडकर, प्रताप बालासाहेब देशमुख, सुरेश गोविंदराव देशमुख, विजय गोपीराज पाटील, शिवाजीराव रामराव देशमुख, डॉ.चंद्रकांत शिंदे, वसंतराव पुंडलिकराव देशमुख, रखमाजी गोविंदराव कवळे, लक्ष्मण परसराम कवळे, गोपाळ बाळासाहेब देशमुख यांची नावे फिर्यादीत आरोपी या सदरात आहेत. बारड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार या दहा जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 83/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार पावडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *