आरोपीचा बाप सुध्दा आरोपी होता; तो खटल्यादरम्यान मरण पावला
नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेसोबत 65 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. पुढे आमच्यावर दाखल केलेला गुन्हा परत घे म्हणून त्या अल्पवयीन बालिकेला 65 वर्षीय व्यक्ती आणि त्याचा मुलगा दोघांनी त्रास दिल्याने त्या बालिकेने दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणातील मुलाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील शिक्षा झालेल्या मुलाचा वडील खटला सुरू असतांनाच मरण पावला होता.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर 65 वर्ष वय असलेल्या व्यंकट ज्ञानोबा गोपाळे यांनी अत्याचार केला. त्यावेळी विमानतळ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत व्यंकट ज्ञानोबा गोपाळे विरुध्द गुन्हा क्रमांक 49/2018 दाखल झाला. त्यानंतर ती बालिका आपल्या कॉलेजला जात असतांना तिला रस्त्यात भेटून व्यंकट ज्ञानोबा गोपाळे (65) आणि त्याचा मुलगा चंद्रमणी व्यंकटराव गोपाळे(38) हे दोघे तिला आमच्यावर दाखल केलेला गुन्हा परत घे म्हणून त्रास देत असत. पोक्सो गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीच्या कुटूंबाने घर बदलले आणि ते पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत राहू लागले. ही घटना आईवडीलांना सांगितली 21 फेब्रुवारी 2018 रोजी त्या बालिकेला पुन्हा असाच रत्यात त्रास देण्यात आला. तेंव्हा त्या बालिकेचे शैक्षणिक वर्ष पुर्ण झाल्यानंतर आपण गावाकडेच जाऊन राहु असे ठरले. पण तिचा त्रास झाला नाही तेव्हा ती राहत असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवर गेली आणि 21 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 10.15 वाजता तिने उडी मारली. या बालिकेच्या डोक्याच्या पाठीमागे गंभीर जखम झाली, हात, पाय, गुडघे आणि पाठ सुध्दा जखमी झाले. उपचार सुरू असतांना 30 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता या बालिकेचा मृत्यू झाला. वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये त्या बालिकेला डोक्यातील जखमामुळे मृत्यू आले असे लिहिले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 286/2018 दाखल केला. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची 306 आणि 34 ही कलमे जोडण्यात आली होती. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीदेवी पाटील यांनी करून व्यंकट ज्ञानोबा गोपाळे (65) आणि त्याचा मुलगा चंद्रमणी गोपाळे (38)या दोघांविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. हा सत्र खटला क्रमांक 144/2019 या क्रमांकाने चालला. दरम्यान व्यंकट ज्ञानोबा गोपाळे यांचा मृत्यू झाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 49/2018 29 ऑक्टोबर 2021 रोजी रद्द झाला. सत्र खटला क्रमांक 144/2019 फक्त चंद्रमणी व्यंकटरापव गोपाळे (38) याच्याविरुद्ध चालला. या खटल्यात सहा साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालय समक्ष नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी चंद्रमणी व्यंकटराव गोपाळेला अल्पवयीन बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार 10 वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठवली. दंडाच्या 50 हजार रुपये रक्कमेपैकी 40 हजार रुपये मयत अल्पवयीन बालिकेच्या वारसांना देण्यात यावे असे आदेश न्यायाधीश बांगर यांनी केले. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार ढोले यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.