नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयातील परिक्षेचे खोटे हॉल तिकिट बनवून नोकरी लावून देण्याची भुल देवून 5 लाख रुपये ठकवणाऱ्या दोघांविरुध्द माहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मारोती मल्हारी नरवाडे (55) रा.अनुसयानगर सांगवी (बु) नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माहुर येथील तुषार एस.भोरेरा, रुपसंगम वस्त्र भंडार माहूर आणि विजय आर.पटवर्धन उर्फ राजेंद्र रणसिंग रा.माळा ता.कळम जि.उस्मानाबाद ह.मु.रुपसंगम वस्त्र भंडार माहुर या दोघांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आणि नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमध्ये नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. त्या ठिकाणी तुमच्या मुलाला नोकरी लावून देतो म्हणून 5 लाख रुपये घेतले. या दोघांनी उच्च न्यायालय औरंगाबाद व नागपूर यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करून त्यावर आपली खोटी स्वाक्षरी करून हॉल तिकिट बनवून दिले. याबाबत मारोती नरवाडे यांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर माहूर न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून माहूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 420, 464, 456, 468, 467, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 154/2023 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पवार अधिक तपास करीत आहेत.
न्यायालय परिक्षेचे बनावट हॉल तिकिट देवून 5 लाखांची फसवणूक