नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागाची सन 2018 मध्ये हडप केलेले 12 एकर 1 गुंठा जमीनीबाबत मुदखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका खाजगी व्यक्तीसह तत्कालीन तलाठी आणि तत्कालीन मंडळाधिकारी यांची नावे आरोपी सदरात आहेत.
दक्षीण मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ अभियंता गोपाळप्रसादसिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.3 जानेवारी 2011 च्या दुपारी 2 वाजेपासून ते आजपर्यंत हा गुन्हा घडला आहे. मुदखेड सर्व्हे नंबर 167 आणि 468 यामध्ये रेल्वे विभागाची 12 एकर 1 गुंठे जागा होती. याची नोंद महसुल विभागाच्या 7/12 या सर्वात महत्वाच्या दस्तऐवजात होती. नांदेड येथील भिमलाल भागुलाल कोतवाल, तत्कालीन तलाठी आणि तत्कालीन मंडाळाधिकारी मुदखेड यांनी 7/12 च्या उत्ताऱ्यात रेल्वे लाईन अशी नोंद असलेल्या जागी खाडाखोड करून, बनावटी करून ही जागा भागुराम गंगाराम कोतवाल ही नोंद घेतली. ही कागदपत्रे खोटी असतांना ती खरी आहेत असे भासवून रेल्वे विभागाच्या त्या जमीनीवर ताबा असतांना फेरफार क्रमांक 2726 नुसार रेल्वे लाईनचे नाव कमी करून ती जमीनी भागुराम गंगाराम कोतवाल यांच्या नावे मालकी हक्कात नोंद केली. तसेच पुढे फेरफार क्रमांक 2731 नुसार वारसा हक्काने ती जमीन भिमलाल भागुराम कोतवाल याच्या नावे लावून रेल्वे विभागाची व शासनाची फसवणूक केली आहे. या तक्रारीनुसार भिमलाल भागुराम कोेतलवाल रा.नांदेड, तत्कालीन तलाठी मुदखेड आणि तत्कालीन मंडळाधिकारी मुदखेड या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 219/2023 दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होण्याची तारीख 16 डिसेंबर 2022 अशी लिहिली आहे. या गुन्ह्याचा तपास मुदखेडचे पोलीस निरिक्षक करणार आहेत.
अभिनंदन रेल्वे विभागाचे
नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यात अशा शासकीय जागा बळकावण्याचे असंख्य प्रकार घडले आहेत. पण त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही ठोसप्रकारे झाली नाही. दक्षीण मध्य रेल्वे विभागाने सन 2011 मध्ये घडलेल्या गुन्ह्याचा पाठपुरावा 12 वर्षापर्यंत केला. त्यातील सर्व मुळ अभिलेखे शोधून काढली आणि संबंधीतांवर गुन्हा दाखल केला.
दक्षीण मध्य रेल्वे विभागाची मुदखेड येथील 12 एकर 1 गुंठा जमीन हडपली; गुन्हा दाखल