नांदेड(प्रतिनिधी)-एका 72 वर्षीय व्यक्तीने तीन अल्पवयीन बालिकांसोबत लैंगिक चाळे केल्याप्रकरणी त्यास एक वर्ष 4 दिवस शिक्षा देण्याचे आदेश पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी जारी केले आहेत.
किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तीन अल्पवयीन बालिका घरासमोर खेळत असतांना त्यांच्या शेजारी राहणारा 72 वर्षीय व्यक्ती रुपचंद मलखान मठावण उर्फ रुपचंद मलबान मठावण याने त्या बालिकांना आपल्या घरात बोलावले आणि तुम्हाला 2 रुपये देतो असे सांगून त्यांच्यासोबत लैंगिक चाळे केले. एका मुलीच्या घरातील आजीबाई बराच वेळ झाला मुलगी दिसत नाही म्हणून शोधा-शोध करत असतांना ती मुलगी रुपचंद मठावणच्या घरी आहे असे त्यांना कळले म्हणून त्यांनी इतर महिलांसोबत तिकडे धाव घेतली. त्या ठिकाणी एक नव्हे तर तीन मुली होत्या आणि त्या कोणत्या अवस्थेत होत्या हे लिहिण्याची ताकत वास्तव न्युज लाईव्हमध्ये नाही. त्यानंतर देण्यात आलेल्या तक्रारीनुसार किनवट पोलीसांनी रुपचंद मठावण विरुध्द भारतीय दंड संहितेची कलमे 354, 376(3) आणि पोक्सो कायद्याची कलमे 4, 8 आणि 12 नुसार गुन्हा क्रमांक 159/2022 दाखल केला. सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वाठोरे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. त्यावर खटला क्रमांक 100/2022 देण्यात आला. या खटल्यात तिन्ही अल्पवयीन बालिकांसह 9 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालय समक्ष नोंदवले. तिन्ही बालिकांनी न्यायालयासमोर आपल्या जबाबात सांगितलेली हकीकत लिहिण्याची हिम्मत सुध्दा वास्तव न्युज लाईव्हमध्ये नाही. उपलब्ध पुराव्या आधारे रुपचंद मठावणने तिन बालिकांसोबत केलेला अत्याचार सिद्ध झाला. त्यानुसार न्यायालयाने रुपचंद मठावणला 1 वर्ष 4 दिवस शिक्षा आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. रुपचंद मठावण पकडला गेला तेंव्हापासून आजपर्यंत तुरूंगातच आहे. याप्रकरणात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली. किनवटचे पेालीस अंमलदार विजय वाघमारे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.