नांदेड(प्रतिनिधी)-मानवीहक्क आयोगाच्या सुनावणी दरम्यान पोलीस अधिक्षक नांदेड हे हजर राहिले नाहीत किंवा कोणतेही शपथपत्र दाखल केले नाही. म्हणून पुढील सुनावणीच्या पुर्वी 10 हजार रुपये भरल्यानंतर नांदेड पोलीसांना आपले शपथपत्र दाखल करता येईल असे आदेश मानवी हक्क आयोग मुंबईचे अध्यक्ष न्यायमुर्ती के.के.तातेड आणि सदस्य एम.ए.सय्यद यांनी जारी केेले आहेत. हा आदेश 12 डिसेंबर 2023 रोजी झाला आहे.
दि.1 जानेवारी 2023 रोजी सचखंड गुरूद्वारा साहिब येथील नववर्षाचा कार्यक्रम संपवून कामठा येथे आपल्या गावाकडे जाणाऱ्या सतवंतसिंघ प्रतापसिंघ कामठेकर (21) आणि नवज्योतसिंघ कामठेकर (19) या दोन युवकांना रात्री 1.30 वाजेच्यासुमारास पोलीस पथकाने भाग्यनगर कमानीजवळ रोखले. त्यांना भरपूर मारहाण केली आणि त्यांच्याविरुध्द गुन्हा सुध्दा दाखल केला. यानंतर प्रतापसिंघ कामठेकर यांनी या मारहाणीबद्दल जिल्हाधिकारी नांदेडकडे तक्रार केली. परंतू तेथेही काही उपयोग झाला नाही म्हणून नांदेड येथील ऍड.परमज्योतसिंघ चाहेल यांनी मुंबई येथील मानवी हक्क आयोगाकडे याचिका क्रमांक 394/13/18/2023 दखल केली. यामध्ये बऱ्याच सुनावण्या झाल्या. 12 डिसेंबर 2023 रोजी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड सुनावणीला हजर होते. परंतू सरकारी वकील ऍड.यशोदिप देशमुख यांनी शाश्वती दिल्यानंतर सुध्दा नांदेडचे पोलीस अधिक्षक हजर नव्हते किंवा त्यांनी कोणतेही शपथपत्र दाखल केली नाही अशी नोंद आदेशात आहे. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी कोणताही योग्य जबाब या संबंधाने दिला नाही. अशा उदासिनतेची निंदा करत आहोत अशी नोंद आदेशात करून नांदेड पोलीसांना पुढील सुनावणीसाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. पण त्या अगोदर त्यांनी 10 हजार रुपये रोख दंड ऍड.परमज्योतसिंघ चाहेेल यांना द्यावा लागेल. दंडातील रक्कम पिडीतांना वाटून देण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे असे आदेशात लिहुन मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची पुढील तारीख 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता न्यायालय क्रमांक 1 येथे सुनिश्चित केली आहे. या प्रकरणात ऍड.सागर सहानी,ऍड.अमनपालसिंघ कामठेकर आणि ऍड.सरबजितसिंघ शाहू हे काम पाहत आहेत.