नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यात ज्यांच्याकडून खंडणी वसुल करण्यात आली अशा लोकांची नावे लपवून दाखल झालेल्या गुन्ह्यात 5 आरोपी तुरूंगात असतांना त्यानंतर रिंदाचे वडील चरणसिंघ आणि रिंदाचा भाऊ सरबज्योतसिंघ यांना अटक झाली. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर चरणसिंघ संधू यांनी दाखल केलेला जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी फेटाळून लावला आहे.
माजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी जुलै 2023 मध्ये तक्रार दिली होती की, काही लोकांकडून रिंदा या दहशतवाद्याच्या सांगण्यावरून खंडणी वसुल केली होती. त्यामध्ये एका व्यक्तीकडून 1 कोटी खंडणी मागितल्यानंतर त्यात तडजोड झाली आणि ती खंडणी 40 लाख रुपये झाली.तसेच एका व्यक्तीकडून 7 लाख रुपये खंडणी घेण्यात आली होती.
या प्रकरणात प्रथम भरतकुमार उर्फ मॅक्सी धर्मदास पोपटाणी (33), मनप्रितसिंघ उर्फ सोनु सुरजनसिंघ औलख (31), इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर, मुक्तेश्र्वर उर्फ गोलु चंद्रविजय मंगनाळे(26), जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू(29) यांना 5 जुलै ते 15 जुलै दरम्यान अटक झाली होती. त्यातील भरतकुमार उर्फ मॅक्सी वगळता सर्वजण तुरूंगातच होते. या प्रकरणाचा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे आला. त्यानंतर त्यांनी 29 नोव्हेंबर 2023 रोजी या प्रकरणातील खंडणी मागणारा रिंदाचे वडील चरणसिंघ उर्फ बापू सोहनसिंघ संधू (66), सरबज्योतसिंघ उर्फ पित्ता चरणसिंघ संधू (29) या दोघांना अटक केली. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांनाची रवानगी तुरूंगात झाली.
यानंतर चरणसिंघ संधूच्यावतीने जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला. या जामीन अर्जात सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी बाजू मांडली. तर चरणसिंघ संधूच्यावतीने ऍड.एन.जी.खान यांनी सादरीकरण केले. युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी चरणसिंघ संधूचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
तुरुंग बदल्यांचा अर्ज फेटाळला
या प्रकरणात चरणसिंघ संधू यांना न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठवल्यानंतर तुरूंग अधिक्षकांनी चरणसिंघ संधू आणि त्यांचे पुत्र सरबज्योतसिंघ यांना नांदेड तुरूंगाऐवजी दुसऱ्या तुरूंगात पाठवावे असा अर्ज केला होता.या अर्जात तुरूंग अधिक्षकांनी सादर केलेली कारणे आणि आरोपींनी त्या कारणांना दिलेली उत्तरे याचा उहापोह केल्यानंतर न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी तुरूंग अधिक्षकांचा अर्ज सुध्दा फेटाळून लावलेला आहे. म्हणजे चरणसिंघ संधू आणि त्यांचे पुत्र सरबज्योतसिंघ आता नांदेड तुरुंगातच राहणार आहेत.