नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या नेतृत्वात मेहनत करून पकडलेल्या एका चोरट्या कडून 35 तोळे सोने 500 ग्रॅम चांदी आणि इतर साहित्य असा एकूण 26 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भाग्यनगर पोलिसांचे कौतुक केले आहे.
26 नोव्हेंबर 2023 रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरांदे नगर येथील रवींद्र जोशी महाराज यांच्या घरी चोरी झाली होती त्या संदर्भाने गुन्हा क्रमांक 452/2023 दाखल होता. पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी आपल्या अधिकारी आणि पोलिसांना यासाठी प्रयत्न करून चोरटा हुडकलाच पाहिजे असे आदेश दिले. त्यानुसार भाग्यनगर पोलिसांनी जवळपास जवळपास 200 ते 300 जागा तपासल्या जेथे सीसीटीव्ही लावलेले आहेत. सतत 20-25 दिवस मेहनत करून त्यांनी एक संशयित फिरणारा चोरटा शोधलाच.
23 डिसेंबर रोजी भाग्यनगर चे पोलीस पथक कष्ट करत असताना पोलिसांनी फरांदे नगर, मोर चौक, छत्रपती नगर,बजाज नगर, एकता नगर, अशा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना तो चोरटा समजला. 23 डिसेंबर रोजी तो चोरटा पोलिसांना जिरायत मैदान परिसरामध्ये पाहताच पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याने आपले नाव अभिजीत उर्फ अभय देवराव राऊत (25) राहणार बेला नगर,भावसार चौक,नांदेड असे सांगितले. पोलिसांनी त्याने अनेक ठिकाणी केलेल्या एकूण 12 चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्यात 35 तोळे सोने, 500 ग्रॅम चांदी, लॅपटॉप,टीव्ही, मोबाईल, कॅमेरा,असा 25 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कार्यवाही केली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्यासह त्यांच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, पोलीस अंमलदार गजानन किडे, दिलीप राठोड, प्रदीप गर्दनमारे, ओमप्रकाश कवडे, हनुमंता कदम आणि सायबर सेल मधील पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर यांचे कौतुक केले आहे.