नांदेड,(प्रतिनिधी)-31 ऑक्टोबर 2023 रोजी सेवानिवृत्त झालेले नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक डी.जी.चिखलीकर यांना विभागीय पोलीस प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर विभाग येथे तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. हे नियुक्ती पत्र छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मुख्यालय शिलवंत नांदेडकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे.
आपल्या चार वर्षाच्या कालखंडात द्वारकादास गोविंदराव चिखलीकरांनी नांदेड जिल्ह्यात रेकॉर्डबे्रक नियुक्ती आणि गुन्हे प्रगटीकरण करून राष्ट्रपती पोलीस पदक सुध्दा मिळवले. त्यांच्या 700 बक्षीसांपैकी 350 पेक्षा जास्त बक्षीसे नांदेड जिल्ह्यातील आहेत. 31 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची सेवानिवृत्ती झाली. त्या अगोदरच त्यांचे सुपूत्र पोलीस उपनिरिक्षक अभिजित चिखलीकर यांचे पोलीस दलात आगमन झाले. त्यानंतर 25 डिसेंबर 2023 रोजी अभिजित चिखलीकरांचा विवाह सोहळा पार पडला आणि 28 डिसेंबर 2023 रोजी चिखलीकरांना नवीन पद प्राप्त झाले.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील 2019 च्या संदर्भानुसार शासकीय आणि निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले वर्ग ब चे अधिकारी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण येथे नियुक्त करता येतात. त्यानुसार डी.जी.चिखलीकर यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण येथे तपासी अधिकारी या पदावर झाली आहे. ही नियुक्ती कंत्राट स्वरुपाची असली तरी सर्व कामे शासकीय पध्दतीनुसार करण्यात येतील. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणचे कार्यालय साई सेंटर, आरटीओ कार्यालयाच्या शेजारी रेल्वे स्थानक रोड छत्रपती संभाजीनगर येथे आहे. बहुतेक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून डी.जी.चिखलीकर आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्विकारतील. वास्तव न्युज लाईव्ह परिवाराच्यावतीने डी.जी.चिखलीकरांना नवीन जबाबदारीसाठी शुभकामना…
डी.जी.चिखलीकर कमबॅक; विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण येथे नवीन नियुक्ती