गुणवत्तापूर्ण कामे करणे ही सुद्धा देशसेवा- कर्नल मनकंवल जीत

पर्वत से सागर तिरंगाया साहसी अभियानात आज चार छोटी विमाने नांदेड विमानतळावर

 

नांदेड (जिमाका) – बॉम्बे सैपर्स युध्द स्मारक शताब्दी आणि कारगिल विजयाच्या 25 व्या वर्षानिमित्त ‘पर्वत से सागर तिरंगा’ हे साहसी अभियान भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत नांदेड विमानतळावर अनुभवी वैमानिकांनी आज चार छोटी विमाने उतरविली. कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांचे शौर्य व त्यागाची माहिती नवीन पिढीपर्यत पोहोचावी तसेच युवा वर्गाने अशा अभियानापासून प्रेरणा घेवून देशसेवेसाठी गुणवत्तापूर्ण काम करण्यातच देशसेवा असल्याचे प्रतिपादन कर्नल मनकंवल जीत यांनी केले.

राष्ट्रीय सैन्य माइक्रोलाइट अभियानांतर्गत आज 4 मायक्रोलाइट विमानाचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी लेफ्टनंट कर्नल एबी टीएम, लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिवाच, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उप विभागीय अधिकारी विकास माने, विमानतळ सुरक्षा अधिकारी बोरगावकर, कॅप्टन संघमित्रा राई, मेजर गरिमा पुनियानी, कॅप्टन प्रियदर्शनी के आदींची उपस्थिती होती. राष्ट्रप्रेमाची भावना वृध्दीगत व्हावी तसेच नव्या पिढीला देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाचे शौर्य याबाबतची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय सैन्याच्यावतीने काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत चार माइक्रोलाईट विमानाने माइक्रोलाइट अभियान 2023-24 सुरु करण्यात आले आहे. या अभियानात ही विमाने काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यत एकूण 9 हजार 500 किमीचा प्रवास पार करतील. या अभियानाच्या माध्यमातून साहसाचे व सांघिक कामाचे प्रदर्शन होणार आहे. हे अभियान देशाच्या प्रादेशिक विविधता आणि सुंदरतेचे प्रतिक असल्याचे कर्नल मन कंवलजीत यांनी सांगितले.

विमानाचे वैमानिक राष्ट्रीय व सैन्य ध्वजाला गर्वाने अवकाशात फडकवणार आहेत. सैन्याचे हे अभिनव अभियान असून यापूर्वी कधीही असे अभियान झालेले नाही. भारतीय सैन्य माइक्रोलाइट अभियानात ही विमाने एकूण 37 ठिकाणी थांबणार असून 37 दिवसांचा प्रवास करणार आहे. हे अभियान महुपासून सुरु झाले असून आज या विमानाचे अमरावती येथून नांदेड विमानतळावर आगमन झाले आहे. नांदेड विमानतळावरुन ही माइक्रोलाइट विमाने उद्या बिदरकडे प्रस्थान करणार असल्याचे भारतीय सैन्याचे कर्नल मन कंवलजीत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *