घरफोड्या करणाऱ्या सराहित गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले

नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून नांदेड परिक्षेत्र अंतर्गत घरफोड्या करून पसार होणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथून एकास ताब्यात घेतले आहे अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड परिक्षेत्रअंतर्गत नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करून धुमाकुळ माजविणारा आरोपी श्रीकांत सर्जेराव चव्हाण (27) रा.धानोरा ता.कळमनुरी जि.हिंगोली यास स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्या गावातूनच गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. त्याने आतापर्यंत 14 घरफोड्या केल्याचे कबुल करून त्यातील 8 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील रामतिर्थ, हदगाव, मुखेड, देगलूर, नायगाव, लोहा अशा पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर या ठिकाणी तीन गुन्हे दाखल आहेत आणि लातूर जिल्ह्यातील निलंगा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. चव्हाण हा सहा घरफोडीच्या गुन्ह्यात फरार आरोपी होता. त्याच्यासोबत त्याचे दोन भाऊ आणि नातेवाईक असे सर्व जण मिळून या घरफोड्या करत असत. आरोपी श्रीकांत चव्हाण याच्याकडून आठ गुन्ह्यातील 94 ग्रॅम(9 तोळे 4 ग्रॅम) सोन्याचे दागिणे आणि 430 ग्रॅम(43 तोळे) चांदीचे दागिणे व एक होंडा कंपनीची शाहीन मोटारसायकल असा एकूण 7 लाख 3 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, गुंडेराव कर्ले, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगिरवाड, ज्वालासिंग बावरी, गजानन बैनवाड, हनुमानसिंह ठाकूर, शेख कलीम यांचे अपर पोलीस अधिक्षक यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *