नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेवर केलेल्या अन्यायाप्रकरणी एका 19 वर्षीय युवकाला विशेष न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी शंकांचा आधार घेत मुक्त केले आहे. सरकारपक्षाला आरोपीला शिक्षेपर्यंत नेण्यासाठी बाजू सिध्द करता आली नाही असे या निकालात लिहिले आहे. या खटल्यात आरोपीच्यावतीने ऍड.गौतम किन्नीकर यांनी बाजू मांडली होती.
17 ऑगस्ट 2022 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनुसार त्या हद्दीतील एका घरात 19 वर्षीय युवक सय्यद अयाज सय्यद अन्वर याने एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केला. हा प्रकार घडला 15 ऑगस्ट 2022 रोजी होता. या प्रकरणातील तक्रारदाराने पुन्हा 18 ऑक्टोबर रोजी पुरवणी जबाब दिला. त्यानुसार युवक सय्यद अयाज विरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. तो विशेष सत्र खटला क्रमांक 99/2022 प्रमाणे न्यायालयात चालला.
न्यायालयात या प्रकरणी सरकार पक्षाने 7 साक्षीदार तपासले आणि बचाव पक्षाच्यावतीने सुध्दा 2 साक्षीदार तपासण्यात आले. त्या घरातील दुसऱ्या एका भांडणाच्या कारणावरुन ही तक्रार देण्यात आली असेल असा कयास काढला गेला. वेगवेगळ्या साक्षीदारांनी त्या दिवशी अर्थात 15 ऑगस्ट 2022 रोजी भांडणाचा प्रकार घडला होता ही बाब न्यायालयासमक्ष मान्य केली होती. एकूण संपूर्ण प्रक्रियेमध्ये न्यायालयासमक्ष आरोपी अयाजला शिक्षेपर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेले मुद्दे सरकार पक्षाला सिध्द करता आले नाहीत म्हणून न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी त्याची मुक्तता केल आहे.
अल्पवयीन बालिकेच्या अत्याचार प्रकरणातून युवकाची न्यायालयातून सुटका