नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथे देवदर्शनाला गेलेल्या एका कुटूंबाला चोरट्यांनी चांगलाच झटका दिला आहे. त्यांच्या घरातून 3 लाखांचा ऐवज चोरला आहे. तसेच दुसरी घटना सुध्दा कुंडलवाडीचीच आहे. एका गाडीला थांबवून 3248 रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.
दुर्गा रामलू दमकुंडवार या 65 वर्षीय महिला 27 डिसेंबर रोजी आपले घर बंद करून कुलूप लावून देवदर्शनासाठी बाहेर गावी गेल्या होत्या.29 डिसेंबर रोजी त्यांचे घर कोणी चोरट्यांनी फोडले आणि घरातील दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 157/2023 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.जी.कासले हे करीत आहेत.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच 29 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता शेख सरफराज शेख एकबाल हे आपले किराणा दुकानाचे साहित्य घेवून चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.37 पी.0344 मध्ये बसून येत असतांना 3 अनोळखी चोरट्यांनी त्यांना थांबवून लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर व डोक्यावर मारहाण केली, वाहन चालकास थापडबुक्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर शेख सरफराजच्या खिशातील 2 हजार रुपये, एक तांदळाचा कट्टा 1248 रुपयांचा असा एकूण 3248 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 341 आणि 34 नुसार दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक शिंदे यांच्याकडे देण्यात आला.
कुंडलवाडीमध्ये घरफोडले आणि एक जबरी चोरी