नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 43.37 टक्के बेहिशोबी मालमत्ता शिवाजी महाविद्यालयाचे एक मुख्य लिपीक (वर्ग-3) यांच्याकडे सापडली. भाग्यनगर पोलीसांनी सेवानिवृत्त मुख्य लिपीक सुर्यकांत रुक्माजी कावळे आणि त्यांची पत्नी सौ.मिना कावळे यांच्याविरुध्द आपसंपत्ती कमावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक कालीदास प्रभाकरराव ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुर्यकांत रुखमाजी कावळे (60) हे मुख्य लिपीक वर्ग-3 श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नी सौ.मिना सुर्यकांत कावळे (51) हे दोघे भावसारनगर चौकातील संकेतनगर येथे राहतात. या दोघांबाबत त्यांनी अपसंपदा जमावल्याची चौकशी 1 जून 1999 ते 7 एप्रिल 2018 पर्यंत झाली. या लोकसेवकाने आपल्या आणि आपल्या पत्नीच्या नावे आज असलेल्या संपत्तीतील 43.37 टक्के संपत्ती ही अपसंपदा आहे. या संपत्तीची एकूण किंमत 33 लाख 57 हजार 86 रुपये आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अपसंपदेबाबत ते योग्य पुरावे सादर करू शकले नाहीत आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देवू शकली नाहीत. असा या तक्रारीचा आशय आहे. सुर्यकांत रुखमाजी कावळे यांच्या घरझडतील 1 किलो 20 ग्रॅम सोने आणि 69 तोळे चांदी असा 59 लाख 6 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज सापडला. या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी सुर्यकांत कावळे आणि सौ.मिना कावळे यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 13 (1) (ई) तसेच सहकलम 13(2) आणि भारतीय दंड संहितेतील कलम 109 प्रमाणे गुन्हा क्रमांक 5/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अरविंदकुमार हिंगोले यांच्याकडे देण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक रमेशकुमार स्वामी, वाचक पोलीस निरिक्षक अश्र्विनीकुमार महाजन, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
नांदेड पोलीस परिक्षेत्रातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे अर्थात जनतेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी हे किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी इसम(एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फिस व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास जनतेने याबाबतची माहिती तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाचा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 यावर सुध्दा लाच, अपसंपदा याची माहिती देता येईल.
आरोपींना पोलीस कोठडी
अपसंपदा प्रकरणात पकडून आणलेल्या दोघां पती-पत्नींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर. पटवारी यांनी तीन दिवस, अर्थात 8 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता एड. रणजीत देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. या प्रकरणात माजी सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोधमगावकर यांनी आरोपींच्यावतीने सादरीकरण केले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलीस कोठडी मंजूर केली.