८ जानेवारीला घरावर पंचरंगी धम्मध्वज उभारावा – भदंत पंय्याबोधी थेरो

नांदेड(प्रतिनिधी) – ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्मध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे यासाठी सन १८८० मध्ये  ‘विश्व बौद्ध धम्म ध्वजाची’ निर्मिती करण्यात आली. विश्व बौद्ध धम्मध्वज दिन समस्त भारतीय बौद्धांचा सण, उत्सव, सोहळा व्हावा यासाठी जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी बौद्ध उपासक किंवा उपासिकांनी आपल्या घरांवर पंचशील धम्मध्वज उभारुन विश्व धम्मध्वज दिन साजरा करावा असे आवाहन तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष, संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे. यावेळी भिख्खू संघ, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, प्रज्ञाधर ढवळे, एस. एन. गोडबोले, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे आदींची उपस्थिती होती.
         विश्व बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथून ८ जाने २०२३ रोजी तब्बल १४४ फुटांचा धम्मध्वज हाती धरून महाधम्मध्वज महापदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा खुरगाव पाटी, पासदगाव, नेरली फाटा, भावसार चौक ते आयटीआय काॅर्नर आणि भ. गौतम बुद्ध यांच्या नियोजित जागेपासून फुले पुतळा ते शिवाजी नगर , कलामंदिर मार्गे शहरातील रेल्वेस्टेशन नजिकच्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहाराने अभिवादन करुन महापदयात्रेचा समारोप होणार आहे.‌ ८ जानेवारी रोजी सर्व बौद्ध बांधवांनी आपल्या घरावर पंचरंगी धम्मध्वज उभारुन महापदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खू संघ आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *