
नांदेड(प्रतिनिधी)-400 वर्षापुर्वीच्या एका खाजगी देवघरात चोरट्याने डल्ला मारला असून त्यातील व्यंकटेश्वराची एक सोन्याची मुर्ती तसेच चांदीचे काही छत्र असा 45 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार सराफा भागातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी घडला आहे.
सराफा भागात मुरली मंदिर येथून 35 किलो वजनाची सोन्याची श्रीगणेश मुर्ती चोरीला गेल्याचा प्रकार जवळपास 11 वर्षापुर्वी घडला होता. काही लोक सांगतात की, पोलीसांनी मुर्ती कोठे आहे हे शोधून काढले होते. परंतू काही कारणांनी त्यात पुढे काहीच झाले नाही. सराफा भाग हा नांदेडचा जुना भाग आहे. मुरली मंदिराच्या समोरच प्रा.बद्रीनारायण धुत यांचे घर आहे. प्रा.धुत हे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून सेवापुर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांच्या घरात 400 वर्षापुर्वीचे देवमंदिर आहे. एक चोरटा परवा रात्री त्यांच्या घरात शिरला. त्याने देवघरातील सोन्याची बालाजी देवाची मुर्ती आणि चांदीचे काही छत्र चोरून नेले आहेत. चोर किती हुशार असेल या देव मंदिरात एकूण 12 मुर्त्या आहेत. परंतू इतर मुर्त्या ह्या सप्तधातुच्या आहेत हे त्याने ओळखले म्हणून त्याने फक्त सोने आणि चांदीचा ऐवज चोरून नेला आहे.
इतवारा पोलीसांनी या प्रकरणी बद्रीनारायण बालमुकूंद धुत यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 2/2024 दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार मोहन हाके हे करीत आहेत.
