नांदेड़ (प्रतिनिधि)-काल नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कावळे पती-पत्नीविरुध्द सापडलेल्या 23 लाख 57 हजार 86 रुपयांच्या अपसंपदेसाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. याच्याशिवाय सुध्दा मोठे घबाड त्यांच्या घरात सापडले आहे. त्याचा हिशोब अजून व्हायचा आहे. सापडलेल्या घबाडाची एकूण किंमत 1 कोटी 24 लाख 27 हजार 905 रुपये होते आहे.
काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संकेतनगर, भावसार चौक नांदेड येथील राहणारे सुर्यकांत रुखमाजी कावळे (60) आणि त्यांच्या पत्नी सौ.मिना सुर्यकांत कावळे (51) यांना अटक केली होती. सुर्यकांत कावळे हे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड येथून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते वर्ग-3 चे कर्मचारी आहेत आणि मुख्य लिपीक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 1 जून 1999 ते 7 एप्रिल 2018 दरम्यानच्या कायदेशीर उत्पन्नाची चौकशी केली त्यामध्ये त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 43.37 टक्के बेहिशोबी मालमत्ता सापडली. या बेहिशोबी मालमत्तेची एकूण किंमत 23 लाख 57 हजार 86 रुपये आहे. या बाबत पोलीस निरिक्षक कालीदास प्रभाकरराव ढवळे यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल झालेल्यानंतर कावळे पती-पत्नीला अटक झाली आणि त्यांच्या घराची घरझडती घेण्यात आली या घरझडतीमध्ये 1 किलो 20 ग्रॅम सोने किंमत 64 लाख 70 हजार रुपये तसेच 69 तोळे चांदी किंमत 51 हजार 405 रुपये आणि रोख रक्कम 59 लाख 6 हजार 500 रुपये या तिन वेगवेगळ्या घबाडाची एकूण किंमत 1 कोटी 24 लाख 27 हजार 905 रुपये होते. या सापडलेल्या घबाडाबाबत वेगळी चौकशी होईल आणि त्या संबंधाचा गुन्हा वेगळा दाखल होईल अशी माहिती जाणकार सुत्रांनी दिली आहे. सध्या कावळे पति-पत्नी 8 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीतच आहेत. त्या दरम्यान सापडलेल्या या घबाडाची सखोल चौकशी होवून त्या विरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही सुध्दा वेगळी होईल.
अपसंपदेत अडकलेल्या कावळेच्या घरात सापडले 1 कोटी 24 लाख 27 हजार 905 रुपयांचे वेगळे घबाड