9 वर्षानंतर जबरी चोरी करणाऱ्या दोघांना पाच महिने सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-9 वर्षापुर्वी एक जबरी चोरी केलेल्या दोन युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.बिरहारी-जगताप यांनी 5 महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस ठाणे विमानतळ येथील बीट मार्शल उत्तम किसन गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जुलै 2014 रोजी रात्री 11.30 वाजता त्यांना पोलीस स्टेशने आदेश दिला की, डीआरएम कार्यालय येथील जालना गेट क्रमांक 3 येथे एक युवक दुचाकीवर येत असतांना दुसऱ्या एका दुचाकीवरील दोन जणांनी त्याला लुटले आहे. आम्ही शिवमंदिरकडे येणाऱ्या रस्त्याजवळ थांबलो असता एका दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.एम.7523 ला थांबवले. त्यावेळी माझ्यासोबत पोलीस अंमलदार संतोष जाधव व राजू पांगरीकर हे होते. त्यावेळी लुट झालेला युवक गोविंद मारोती पवार हा आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 डी.यु.354 वर बसून आला. त्याने त्या लुट करणाऱ्या दोघांना ओळखले. गोविंद पवारकडून लुटणारूंनी 6 हजार रुपयांचा मोबाईल आणि 10 रुपये लुटले होते. लुट करणाऱ्यांची नावे लक्ष्मीकांत उर्फ कृष्णा मारोती केंद्रे (19) रा.साईबाबा मंदिराजवळ नांदेड आणि शेख अकरम शेख मुराद (24) रा.पिरबुऱ्हाणनगर गल्ली नंबर 12 हे होते.
विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्या दोन्ही लुटारुंना अटक केली. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पिसे यांनी या दोघांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयासमक्ष उपलब्ध झालेल्या पुराव्या नुसार न्यायाधीश एस.एम.बिरहारी-जगताप यांनी या दोघांना 5 महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी 500 रुपये रोख दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी वकील ऍड.अजित डोनेराव यांनी काम केले. तर पैरवी अधिकाऱ्याची जबाबदारी पोलीस अंमलदार रामदास सूर्यवंशी यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *