नांदेड(प्रतिनिधी)-सन 2012 मध्ये आपली अवैध वाहतूक गाडी झाडाला धडकून देणाऱ्या चालकाला सन 2017 मध्ये अर्धापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता या चालकाला तुरुंगात जावे लागले आहे.
दि.13 मे 2012 रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास वसमत-हिंगोली रस्त्यावर मेंढा पाटी जवळ एम.एच.26 एस.135 क्रमांकाची अवैध प्रवासी वाहतुक करणारी गाडी चालक देवानंद नागोराव कदम याच्या हाताने अनियंत्रीत झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात 70 वर्षाच्या शारदाबाई, 55 वर्षाच्या लक्ष्मीबाई, 23 वर्षाचे संदीप आणि 2 महिन्याची बालिका माधुरी अशा चौघांचा मृत्यू झाला होता. याबाबत गिरगाव येथील राजू जळबाजी लामटिळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अर्धापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 86/2012 भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 337, 338, 304(अ) नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार आर.एन.कराड यांनी केला होता.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय अर्धापूर येथील देवानंद नागोराव कदम विरुध्द खटला चालला. या खटल्यात 5 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले आणि तत्काली अर्धापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.सरोदे यांनी 13 एप्रिल 2017 रोजी चालक देवानंद नागोराव कदमला भारतीय दंड संहितेच्या कलम 279 साठी सहा महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड तसेच 304(अ) साठी सहा महिन्यांची सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली होती. या शिक्षा देवानंद कदमला एकत्रीत भोगायच्या होत्या. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.जी.एस.मोरे यांनी मांडली होती. देवानंद कदमचे वकील ऍड.आर.व्ही.पाटील हे होते.
शिक्षा ही 7 वर्षाच्या आतील असल्यामुळे तिला स्थगिती घेवून आर.व्ही.पाटील यांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अपील सादर केले. त्याचा क्रमांक 39/2017 असा आहे. या अपील सुनावणी दरम्यान देवानंद कदमची बाजू आर.व्ही.पाटील यांनी मांडली. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी सादरीकरण केले. या प्रकरणाचा निकाल देतांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी 2017 मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या शिक्षेत कोणताही दखल दिलेला नाही आणि अपील नामंजुर केले. त्यामुळे 2012 मध्ये अपघात करणाऱ्या चालक देवानंद नागोराव कदमला 2024 मध्ये तब्बल 12 वर्षानंतर तुरूंगात जावे लागले.
