22 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यात सुट्टी जाहीर करा; जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नांदेड(प्रतिनिधि) -22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा होत असल्याने नांदेड जिल्ह्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, या मागणीचे निवेदन श्री राजपुत करणी सेना, महाआरती परिवार, श्रीराम जन्मोत्सव समिती नांदेडच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविले.

22 जानेवारी रोजी श्रीराम प्रभु मंदिराचा अयोध्या येथे लोकार्पण सोहळा साजरा होत असल्याने संपूर्ण भारतातील तसेच विदेशातील भक्त श्रीराम प्रभुचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत.

पाचशे वर्षापासून सुरु असलेल्या संघर्षाला मूर्त स्वरुप येत असल्यामुळे 22 जानेवारी 2024 हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरात लिहिला जाणार असून भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहण्यासाठी व त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यासाठी सोमवार, दि. 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी.

त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यात प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत श्रीराम प्रभुचे पूजन होणार आहे. हा सण साजरा करण्याचा नांदेड जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना तसेच शैक्षणिक संस्थांना आपल्या अधिकारानुसार दि. 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी श्री राजपुत करणी सेना, नांदेडचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शंकरसिंह ठाकुर, श्रीराम जन्मोत्सव समितीचे गणेशसिंह ठाकूर, निलेशसिंह बैस, मनोजसिंह ठाकूर, दीपकसिंह गहलोत, अर्चितसिंह चौधरी, कुणालसिंह चौहान, जितेंद्रसिंह ठाकूर, हुकूमसिंह गहलोत, साईसिंह रघुवंशी, विश्वजितसिंह परदेशी, सौ. कांचनसिंह गहलोत, महाआरती परिवारचे वैरणदेवी मठाचे महंत कल्याण गिरी महाराज, दुर्गासिंह ठाकूर, ओंकार मिश्रा आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *