नांदेड(प्रतिनिधी)-गंजगाव ता.बिलोली येथे 9 जून 2023 रोजी घडलेल्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर बिलोली पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दि.9 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता कृष्णा रामलू बालगावे (25) या युवकाचे प्रेत नदीच्या काठावर सापडले होते. त्यावेळी या प्रकरणी आकस्मात मृत्यू दाखल झाला होता. त्यानंतर न्याय मिळविण्यासाठी कृष्णा वडील रामलू सायलू बालगावे यांनी न्यायालयाची दारे ठोठावली. त्यात तीन जणांनी जुन्या दुश्मनीच्या कारणावरून भांडण विसरुन पार्टी करू असे म्हणून कृष्णाला नदी काठावर नेले. त्याला दगडाने ठेचतांना तोंडावर, नाकावर, गळा दाबून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी कृष्णा बावलगावेचे प्रेत नदीपात्रात फेकून दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिलोली न्यायालयाने फौजदारी संहितेच्या कलम 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर बिलोली पोलीसांनी कृष्णा रामलू बावलगावेच्या खुनास जबाबदार असणाऱ्या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 323, 201, 34 नुसार गुन्हा क्रमांक 2/2024 दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरिक्षक बळेगावे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
सहा महिन्यापुर्वीच्या मृत्यूप्रकरणी बिलोली पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर खूनाचा गुन्हा दाखल केला