
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये 86.80 टक्के वकील सदस्यांनी मतदान केले. कोण अध्यक्ष होणार हे उद्या मतमोजणीनंतर समजेल. पण जो कोणी अध्यक्ष होईल, त्याचे नाव नवीन कोर्टाच्या उद्घाटन समारंभातील शिलालेखावर कोरले जाईल,हे मात्र नक्की. यामुळेच या निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आला असे लिहिले तर चुक ठरणार नाही.
ऑगस्टमध्ये व्हायची निवडणुक यंदा पाच महिने उशीरा झाली. यामध्ये एकूण 1813 सदस्यांनी आपले मतदान म्हणून नाव नोंदवले होते. आज सकाळी मतदान सुरू झाले. संध्याकाळी मतदान संपले तेंव्हा 1813 पैकी 1574 सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 86.80 एवढी झाली. यामध्ये 11 मतदान करणाऱ्यांवर आक्षेप घेण्यात आला. आक्षेप घेणाऱ्यांच्या मते हे 11 सदस्य नांदेड जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवून घेतले आहेत. यावर निर्णय झाल्यानंतर त्या मतांची मोजणी होईल.

अध्यक्ष कोण होणार हे आता मतपेटीमध्ये बंद झाले आहे. उद्या या मतदानाची मोजणी होणार आहे ती बहुदा रात्री उशीरापर्यंत चालेल. या मतदानातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, विशिष्ट सहाय्यक आणि 14 सदस्य निवडले जातात. सर्वांच्या मतदान पत्रिका वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मतमोजणीला उशीर लागतो.
या निवडणुकीच्या अध्यक्ष पदात ऍड.आशिष गोदमगावकर, ऍड.जगजीवन भेदे आणि ऍड.राहुल कुलकर्णी अशी तिरंगी लढत होणार आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीच्या तयारीत अनेकांनी लाखोंची माया उधळली आहे. त्याबद्दल असे सांगितले जाते की, पुढील दोन वर्षात नवीन न्यायालय इमारतीचे उद्घाटन होईल आणि त्या उद्घाटनातील न्यायालयाच्या इमारतीवर लागणाऱ्या शिलालेखात आपले नाव कोरले जाईल यासाठी ही लाखोंची माया उधळली गेली आहे. ऍडव्हकेट संघातील सदस्य कोणालाही ही संधी आपल्या मतदानाद्वारे देतात हे उद्या कळेल. पण या निवडणुकीदरम्यान काही वरिष्ठ वकील मंडळींच्या बैठकीमध्ये हा माया उधळण्याचा प्रकार कसा सुरू झाला, कोणी केला, यावर सुध्दा चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.


