नांदेड (प्रतिनिधी)- वारीस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंघ हा दिब्रूगड आसाम येथे स्थानबद्ध असताना त्याचे काही कुटूंबीय आणि साथीदार नांदेडला आले होते. पंजाब पोलिसांचे पथक सुद्धा त्यांच्या मागावर होते. नांदेड पोलिसांनी त्या गटातील एकाची ओळख पंजाब पोलिसांना पटविल्यानंतर नांदेड पोलिसांनी त्याला पकडून देण्यासाठी पंजाब पोलिसांना केलेल्या मदतीसाठी दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी नांदेड जिल्हा पोलिसांचे आभार व्यक्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
वारीस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख तथा अनंतपूर खालसा फोर्स (एकेएफ) या संघटनेचा स्थानबद्धतेत असलेला आरोपी अमृतपालसिंघ तरसेमसिंघ संधू याचे कुटूंबीय आणि इतर काही मंडळी नांदेडला डिसेंबर महिन्यात शेवटच्या तीन दिवसांत आली होती. पंजाब गुप्तचर विभागाने नांदेड पोलिसांना आपल्या पथकाला मदत करण्यास सांगितले, तेव्हा नांदेड येथील पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहायक पोलीस अधीक्षक किरितिका यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे, हरविंदरसिंघ चावला, पोलीस अंमलदार यांनी या पंजाब येथून आलेल्या लोकांवर नजर ठेवली. त्यांनी नांदेडमध्ये एक धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. तेव्हा नांदेड पोलिसांनी त्या पथकातील लोकांच्या गुप्तपणे फोटो घेऊन पंजाब पोलिसांना पाठविला. पंजाब पोलिसांनी त्यातील गुरूप्रितसिंघ पालसिंघ भिकीविंड यास ओळखले, तो पंजाब पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यात हवा आहे. नांदेड येथून हे सर्व लोक परत निघत असताना नांदेड पोलिसांनी ही माहिती पंजाब पोलिसांना दिली. ही मंडळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहचताच पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलीस यांनी गुरूप्रितसिंघ पालसिंघ यास अटक केली आणि त्यांनी नांदेड पोलिसांना दुरध्वनीवरून केलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त केले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.